मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर डिजिटल इंडियाची गती वाढल्याचे दिसून येत आहे. यूनिफाईड पेमेंटस इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारात २० टक्क्यांची वाढ झाली. मोबाइलवर आधारित नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या माध्यमातून हे काम होत आहे.
यूपीआयवर आधारित व्यवहार जानेवारीत १६६० कोटी रुपयांचे होते. ते मार्चमध्ये २००० कोटींवर पोहोचले आहेत. काळ्या पैशांचा अंत करण्यासाठी देशातील नागरिकांनी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले असताना याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ए. पी. होता यांनी सांगितले की, आमच्यामार्फत ४४ बँकात यूपीआयवर आधारित काम होते. यापैकी ३५ बँकांचे गुगल प्ले स्टोअरवर स्वत:चे अॅप आहेत. भीम अॅपच्या माध्यमातून दररोज ८० हजार व्यवहार होतात.
>अॅपच्या माध्यमातून व्यवहार होण्याचे प्रमाण वाढले
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ए. पी. होता याबाबत म्हणाले की, यूपीआय व्यवहारासाठी आम्ही रिलायन्स रिटेलशी करार केला आहे. यासाठी अधिकाधिक व्यापाऱ्यांनाही आम्ही प्रोत्साहित करीत आहोत.
बिगर बँकांचे यूपीआय अॅपही बाजारपेठेत मोठा हिस्सा काबीज करत आहेत. फ्लिपकार्टचे पेमेंट अॅप ‘फोन पे’चे सीईओ समीर निगम म्हणाले की, यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या एकूण व्यवहारांपैकी अर्धे व्यवहार आणि इतर डिजिटल माध्यमातून होणाऱ्या एकूण व्यवहारांपैकी २२ ते २५ टक्के व्यवहार हे आमच्या अॅपने होतात. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, ई वॉलेटच्या माध्यमातून किमान २५० ते ४ हजार रुपयांचे व्यवहार होतात.
नोटाबंदीनंतर डिजिटल इंडियाची गती वाढली
नोटाबंदीच्या निर्णयानंतर डिजिटल इंडियाची गती वाढल्याचे दिसून येत आहे
By admin | Published: April 6, 2017 12:18 AM2017-04-06T00:18:08+5:302017-04-06T00:18:08+5:30