सध्या लोकं रोख पैशांमध्ये व्यवहार करण्यापेक्षा डिजिटल व्यवहारांकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत. नोटबंदीनंतर अनेक भारतीयांनीडिजिटल पेमेंटचा पर्याय अवलंबण्यास सुरुवात केली. आज आपली बहुतांश लोकसंख्या 'डिजिटल इंडिया'मध्ये गणली जाते. कोरोना महासाथीच्या संकटाने तर डिजिटल पेमेंटचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यात वाढीला वेग दिला.
यामुळे ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी बदलल्या आणि त्यातून पेमेंट कंपन्यांसमोर नाविन्यपूर्ण पर्याय देण्याचे आव्हान उभे राहिले. रोख रक्कम ते डेबिट/क्रेडिट कार्ड ते स्वाइप न करता पेमेंटवर अवलंबून असणं असा लक्षणीय बदल आता झाला आहे. विविध पेमेंट पर्याय उपलब्ध झाल्याने ग्राहकांना त्यांच्या सोयीचा पर्याय पेमेंट करण्यासाठी निवडण्याचे स्वातंत्र्य लाभले. त्याचप्रमाणे, व्यापारीही ऑल-इन वन स्मार्ट पीओएससारख्या आधुनिक डिजिटल व्यासपीठांचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे त्यांना टॅप अॅण्ड पे, क्यूआर कोड आणि भिम यूपीआय यासारखी विविध लोकप्रिय पेमेंट माध्यमे अनेक उपकरणांऐवजी एकाच उपकरणावर वापरता येऊ लागली.
भीम यूपीआयमार्फत २७३ कोटींचे व्यवहार
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च २०२१ मध्ये भीम यूपीआयमार्फत व्यवहारांची संख्या दुप्पटीपेक्षा अधिक, म्हणजेच २७३ कोटी रुपये झाली आहे. मार्च २०२० मध्ये भीम यूपीआयमार्फत सुमारे १२५ कोटी रूपयांचे व्यवहार झाले होते. दरम्यान सणासुदीच्या काळात ५७ टक्के लोकांनी आठवड्यात दोन पेक्षा अधिक वेळा डिजिटल पेमेंटचा वापर केला असल्याचं ACI Worldwide आणि YouGov यांनी 2020 मध्ये केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. यापूर्वी हे प्रमाण ४३ टक्के होते. प्रमाणाचा विचार करता आधीच्या १५ टक्क्यांच्या तुलनेत आता २९ टक्के ग्राहकांनी दिवसातून एकदा तरी डिजिटल पेमेंटचा वापर केला आहे.
सूक्ष्म, लघू व्यवसायिकांना फायदा
देशातील डिजिटल पेमेंटची वाढ आणि तृतीय तसंच चतुर्थ श्रेणी शहरांमधील त्यांचा वाढता वापर यामुळे या भागातील सूक्ष्म आणि लघू व्यावसायिकांना फायदा झाला आहे. ई-कॉमर्समधील तेजीमुळे त्यांना त्यांची उत्पादने/सेवा जगभरात पोहोचवता आल्या. तसेच, डिजिटल पेमेंटमुळे जलद पेमेंट आणि रिफंड/सोप्या पद्धतीने पुनर्रचना करणे खऱ्या अर्थाने संपर्करहित, सीमारहित पद्धतीने होऊ लागले.
विविध डिजिटल पेमेंट व्यासपीठांच्या वाढत्या लोकप्रियतेचा लाभ घेण्यासाठी अनेक फिनटेक कंपन्या नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रयत्न करत आहेत. उदा. एटीएमसाठी AGS QR Cash सुविधेमुळे वापरकर्त्यांना संपूर्णपणे संपर्करहित पद्धतीने पैसे काढता येतात. बँकेच्या खातेधारकाला फक्त एटीएम स्क्रीनवर दिसणारा क्यूआर कोड आपल्या स्मार्टफोनमध्ये स्कॅन करावा लागतो. त्याचप्रमाणे, काही डिजिटल पेमेंट कंपन्या एमएसएमईजना त्यांचे स्वत:चे लॉयल्टी उपक्रम राबवण्याची संधी देतात. त्यामुळे या व्यावसायिकांना विश्वासार्ह ग्राहक मिळवता येतात आणि त्यातून व्यवसायाचा आवाकाही वाढतो. स्थानिक किराणा स्टोअरमध्ये किंवा पेट्रोलपंपावर पीओएस टर्मिनलवरही तात्काळ मोटर इन्शुरन्स उपलब्ध करून देणे यासारख्या मूल्यवर्धित सुविधाही उपलब्ध आहेत. ग्राहकांना त्यांच्या नजिकच्या टचपॉईंट्सवर सोय आणि पारदर्शकता देण्यासाठी डिजिटल पेमेंट कंपन्या कशा प्रकारे नाविन्यपूर्ण सेवा देत आहेत, याचे हे उत्तम उदाहरण आहे. नुकतेच व्हॉट्सअप या लोकप्रिय मॅसेजिंग अॅपनेही अॅमेझॉन पे, गुगल पे आणि इतर अनेकांसोबत यूपीआय व्यासपीठावर डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या लाखो वापरकर्त्यांचा विचार करता देशातील डिजिटल पेमेंट्स परिसंस्थेत सहज प्रवेश करण्यासाठी हे पाऊल उचलले जाणे अपेक्षितच होते.
महासाथीमुळे शून्य संपर्क हा नवा नियम
या महासाथीमुळे प्रवासाच्या पद्धतीतही बदल झाले आहेत. सोशल डिस्टंसिंग आणि शून्य संपर्क हे नवे नियम झाले आहेत, स्मार्ट टिकिटिंगही अधिक वापरलं जातंय. तुम्ही फक्त एक बटन क्लिक करून तिकिट बुक करू शकता, मेट्रोच्या फ्लॅप गेटवर QR कोड स्कॅन करू शकता, अगदी सहज कॅब बुक करू शकता आणि अगदी फास्टलेनसारख्या अॅप्लिकेशनचा वापर करून डिजिटली इंधनही घेऊ शकता. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (National Common Mobility Card – NCMC) मुळे ग्राहकांची अधिकच सोय होणार आहे. कारण खरेदी, पार्किंग, रेल्वे, मेट्रो आणि अगदी बसच्या प्रवासासाठीही त्यांना एकच 'इंटरऑपरेबल' कार्ड वापरता येणार आहे. वन नेशन वन कार्ड अशी सुयोग्य ओळख असणारा हा पर्याय प्रवास आणि डिजिटल पेमेंट्सना देशभरात मोठ्या प्रमाणावर एकत्र आणेल.
FASTSAG सारख्या पर्यायांमुळेही फायदा
राष्ट्रीय महामार्गांवरही आरएफआयडी तंत्रज्ञानावर चालणाऱ्या FASTSAG सारख्या पर्यायांमुळे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल जमा करण्यास चालना मिळाली आहे आणि टोल प्लाझावरून सहजरित्या चटकन बाहेर पडता येते. त्याचप्रमाणे, रोखीच्या व्यवहारांवर चालणाऱ्या रीटेल व्यवसायानेही आता रोखीचे व्यवस्थापन, मालाचे व्यवस्थापन, ग्राहकसंबंध व्यवस्थापन यासारख्या गुंतागुंतीच्या कामांसाठी आता डिजिटल व्यासपीठांचा अवलंब केला आहे. QR अॅनालिसिस रिपोर्ट नुसार सुमारे २० दशलक्ष व्यावसायिक क्यूआर कोडच्या माध्यमातून सेवा देतात, यात क्लोज्ड-लूप क्यूआरचाही समावेश आहे. India Transact Service Limited या एका आघाडीच्या डिजिटल पेमेंट सेवाप्रदाता कंपनीनुसार ५७ टक्के ग्राहक आठवड्यातून ५-६ वेळा डिजिटल पेमेंटचा वापर करतात. या वाढीला चालना मिळावी असा लक्षणीय अवलंब देशभरात होत असल्याचे या दोन आकडेवारींवरून स्पष्ट होते.
भारतातील पेमेंट पद्धतींचा आजवरचा प्रवास व्यापक पद्धतीने वाढला आहे आणि विविध सरकारी उपक्रम, नियमांमधील बदल आणि ग्राहकांच्या बदलत्या सवयी यामुळे ही वाढ यापुढेही होत राहील. आरबीआयसारख्या नियामक संस्था आणि NPCI नेटवर्क्स यांनी देशातील डिजिटल परिसंस्थेला आवश्यक असे पाठबळ दिले आहे. त्यामुळे ही आर्थिक परिसंस्था वेगाने बळकट झाली आहे. अधिकाधिक लोक आपणहून डिजिटल पेमेंट्सचा पर्याय स्वीकारत असताना डिजिटल सुरक्षा आणि पारदर्शकता हे दोन महत्त्वाचे मुद्दे भारताला 'लेस-कॅश' अर्थव्यवस्था बनवण्यास सहाय्य करतील.
- रवी गोयल
(अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजी लिमिटेड)
Digital Payment ला चालना; मार्च महिन्यात BHIM UPI द्वारे २७३ कोटींचे व्यवहार
Digital Payment : गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात डिजिटल व्यवहारांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 04:10 PM2021-04-21T16:10:08+5:302021-04-21T16:11:56+5:30
Digital Payment : गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात डिजिटल व्यवहारांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ
Highlightsगेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात डिजिटल व्यवहारांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढकोरोनाच्या कालावधीत डिजिटल व्यवहारांना चालना