नवी दिल्ली - तुम्ही रेशन कार्डधारक असाल आणि सरकारकडून दर महिन्याला राबविण्यात येत असलेल्या रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लोकांच्या सुविधेसाठी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे रेशन मिळवण्यासाठी आता लांबच लांब रांगेत उभे राहण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. एवढंच नाही तर सरकारने उचललेल्या पावलाचा लोकांना फायदा देखील मिळू लागला आहे.
उत्तराखंड सरकारने जाहीर केलं आहे की जुलै 2022 अखेर सर्व रेशन कार्डधारकांचे रेशन कार्ड डिजिटल होतील. जुलैअखेरपर्यंत संपूर्ण राज्यातील प्रत्येकाला डिजिटल रेशन कार्ड वितरित केलं जाईल. या कार्डमुळे लाभार्थ्यांना अनेक फायदे मिळतील.
सर्वांना होणार मोठा फायदा
रेशन कार्ड डिजिटल करण्याची योजना 2020 मध्ये सुरू झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे आता या योजनेला गती देण्यात आली आहे. जुलै 2022 अखेरपर्यंत सर्वांना डिजिटल रेशन कार्ड देण्यात येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मे 2022 पर्यंत 12 लाख 58 हजार 544 रेशन कार्डधारकांना डिजिटल रेशन कार्ड वितरित करण्यात आले आहेत.
डिजिटल रेशन कार्ड म्हणजे काय?
स्मार्ट रेशन कार्ड सोबत नेणंही सोपं होणार आहे, याशिवाय रेशन कार्डचा युनिक नंबर संपूर्ण देशात फक्त एकाच ग्राहकाचा असेल. इतकंच नाही तर डिजिटल पद्धतीने स्मार्ट कार्डच्या या युनिक कार्डमुळे ग्राहकांना त्यांच्या रेशनची संपूर्ण माहितीही सहज घेता येणार आहे. याद्वारे लाभार्थ्यांना त्यांनी कधी आणि किती रेशन घेतले याची माहितीही मिळू शकणार आहे.
एटीएममधून काढता येणार रेशन
राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री रेखा आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पात्र लोकांना दुकानात जावं लागणार नाही. ही योजना सुलभ व्हावी यासाठी विभाग नवीन योजनेवर काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. लवकरच पायलट प्रोजेक्ट म्हणून काही जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. कॅबिनेट मंत्री रेखा आर्य यांनी ज्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती गरजेच्या वेळी एटीएममधून पैसे काढते, त्याचप्रमाणे आता पात्र लोकांनाही धान्य घेता येणार आहे असं सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.