Join us  

छोट्या, मोठ्या व्यापाऱ्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञान ठरू शकतं वरदान; पण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 7:02 PM

छोट्या व्यवसायांना कामकाजात कमाल परिणामकारकता गाठण्यासाठी आणि वित्तीय गरजांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा संपूर्णपणे अवलंब करणे अद्यापही शक्य झालेले नाही.

रविश नरेश

छोट्या व्यवसायांमध्ये कामकाजाचे व्यापक स्वरुपावर डिजिटायझेशन करणे ही तशी नवी संकल्पना आहे. व्यावसायिक कामकाजात कमाल परिणामकारकता गाठण्यासाठी आणि वित्तीय गरजांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा संपूर्णपणे अवलंब करणे त्यांना अद्यापही शक्य झालेले नाही. यामागे बरीच कारणं आहेत. तसे पाहता, डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात अनेक अडचणी आहेत. वाजवी किमतीतील स्मार्टफोन, ग्रामीण भागात सुयोग्य डेटा कनेक्टिव्हिटी नसणे आणि डिजिटल बदलांची तयारी आणि त्यासाठी लागणारी जागरुकता यांची वानवा अशी काही कारणे यामागे आहेत. मात्र, डिजिटल अवलंबाच्या संदर्भात सोयीसुविधांच्या बाबतीत आपण चांगली प्रगती केली आहे. भारतातील एमएसएमई हळूहळू डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. अशा परिस्थितीत, एक टेक इनोव्हेटर्स म्हणून, छोट्या उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय देणारे डिजिटल व्यासपीठ निर्माण करण्यासाठी आम्ही सक्रियपणे प्रयत्न करायला हवेत. एमएसएमईजसाठी लक्षणीय मूल्यनिर्मिती करण्यात तंत्रज्ञानाला अपयश आले किंवा छोट्या व्यवसायांच्या दैनंदिन व्यापाराच्या स्वरुपाशी ते सुसंगत ठरले नाही तर ऑफलाइन ते ऑनलाइन हा बदलच घडू शकणार नाही.

पहिल्यांदा डिजिटल सेवा वापरणाऱ्यांच्या अडचणी किंवा पहिल्यांदाच वापरल्या जाणाऱ्या सेवा संदर्भातील अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, एमएसएमईजसाठी नाविन्यपूर्ण पर्याय विकसित करताना त्यासंदर्भात मापदंड ठरवणे बऱ्याचदा कठीण असते. एमएसएमईजसोबत आम्ही सातत्याने काम करत आहोत. त्यातून एमएसएमई व्यवसाय आणि वापरकर्त्यांच्या वापरासंदर्भात काही ठळक मुद्दे स्पष्ट झाले आहेत. या एमएसएमईजचे व्यवसायिक चलन केंद्रस्थानी ठेवून या क्षेत्रासाठी नवे पर्याय निर्माण करणे फिनटेक समुदायासाठी फार महत्त्वाचे आहे. कारण, त्यामुळे डिजिटायझेशनशी संबंधित कोणत्याही अडचणींविना सहजसोप्या पद्धतीने डिजिटल बदलांचा अवलंब केला जाईल, याची खातरजमा होईल.

>> ऑनलाइन आणि रोखी व्यवहारांवर लक्ष ठेवा: भारताची अर्थव्यवस्था नेहमीच रोखीवर भर देणारी होती आणि नजीकच्या भविष्यकाळात ती तशीच राहील, विशेषत: निमशहरी आणि ग्रामीण भागात. कोणत्याही छोट्या स्थानिक व्यवसायासाठी रोखीचे व्यवस्थापन ही एक मोठी समस्या असते. आपल्याकडे ऑनलाइन पेमेंटच्या सुविधा आहेत, ही फार चांगली बाब आहे. मात्र, रोखीच्या व्यवस्थापनात साह्यकारी ठरतील आणि व्यापाऱ्यांना उधारीची रक्कम परत मिळवण्यात साह्य करतील अशा साधनांवर आपण भर द्यायला हवा. परिणामकारक स्वरुपातील खेळती रोख रक्कम हा डिजिटायझेशनचा या असंघटित क्षेत्राला झालेला सर्वात मोठा फायदा आहे. उदा. एखाद्या भाजी विकणाऱ्या स्त्रीसाठी २५ टक्के ग्राहकांच्या रोखीच्या व्यवहारात दिवसभरात सुट्टे पैसे देणे, लगेचच पैसे न देणाऱ्या ग्राहकांची वहीत नोंद ठेवणे, उधारी मिळवण्यासाठी रिमाइंडर्स पाठवणे अशा प्रकारच्या कामांसाठी किती वेळ जातो आणि त्यासाठी कोणकोणते स्रोत लागतात याचा अंदाज बांधणे. प्रत्यक्षात बहुतांश छोट्या व्यापाऱ्यांकडे रोखीचे व्यवहार करणारे ग्राहक २५ टक्क्यांपेक्षा अधिकच असतात. त्यामुळे, एमएसएमईजसाठी रोखीवर चालणाऱ्या व्यवहारांमध्ये सहजता आणण्यासाठी नवे पर्याय शोधायला हवेत.      

>> क्लाऊडवर डेटा बॅकअप : भौतिक स्वरुपातील काहीही हरवू शकते. व्यवहारांच्या नोंदी आणि अगदी स्मार्टफोनही हरवू शकतोच. पण, क्लाऊड बॅकअप असलेला डेटा हरवत नाही. डिजिटायझेशनचा सगळ्यात लक्षणीय फायदा म्हणजे व्यापाऱ्यांचा डेटा काहीही झाले तरी कायम सुरक्षित राहतो. फोन, हिशोबाच्या वह्या किंवा व्यावसायिक नोंदींची कागदपत्रे हरवणे, खराब होणे ही समस्या एमएसएमईजना वारंवार भेडसावत असते. त्यामुळेच, डेटा बॅकअप ही फार मोठी मूल्यवर्धक सोय आहे. वापरकर्त्यांना पासवर्डने सुरक्षित केलेला डेटा कधीही आणि कुठल्याही डिव्हाइसवरून हाताळता येतो, यासंदर्भात त्यांना शिक्षित करणे हे एमएसएमईजच्या डिजिटल बदलांना चालना देण्यात फार महत्त्वाचे ठरेल.

>>  वापरण्यातील सहजता : अर्थव्यवस्थेतील सगळ्यात सूक्ष्म अशा व्यापाऱ्यासाठी जेव्हा तुम्ही एखादी सुविधा निर्माण करत असता तेव्हा स्मार्टफोनवर अत्यंत सहजसोप्या संवादात्मक युझर इंटरफेससोबत तंत्रज्ञान पुरवणे ही पहिली पायरी असायला हवी. युझर इंटरफेसपलिकडेही तुम्ही विचार करून शकलात तर सोन्याहून पिवळे! तंत्रज्ञानाच्या वापरातून पेमेंट्स, अकाऊंटिंग आणि फायनान्स, कोणीही नोंदी करू शकेल आणि त्या नोंदी वाचू शकेल इतकं सोपं करता येईल का? छोट्या व्यवसायांना व्यवसायाशी संबंधित डेटा अॅनालिटिक्स सहज आणि समजण्यास सोप्या स्वरुपात वापरता येईल का? त्यांना व्यवसायासाठी कर्ज घेताना प्रचंड कागदपत्रे आणि इतर कटकटींपासून सुटका मिळेल आणि त्यांचा वेळ वाचू शकेल का? एमएसएमई व्यवसायांसाठी या पद्धती आणि कामकाज तंत्रज्ञानामुळे किती सहजसोपे होते यावर ते डिजिटायझेशनचे मूल्य जोखत असतात.

>> विश्वास: डिजिटायझेशनमुळे एमएसएमई पुरवठा साखळीतील प्रत्येक व्यवहार किंवा डेटा एंट्री रिअल-टाईममध्ये पाहता येते. भारतातील एमएसएमई क्षेत्र हा विश्वासावर चालणारा उद्योग आहे. ते आपले व्यावसायिक भागीदार आणि त्यांच्यासोबतच्या नात्यांना फार जपतात. त्यामुळे, कमीतकमी चुका आणि तक्रारी असतील अशा पद्धतीने अडचणी सोडवण्यावर भर देणे फार महत्त्वाचे आहे. उदा. बऱ्याचदा प्रत्यक्ष वहीत नोंदी लिहिल्या जाताना चुका फार होतातच, शिवाय काही काळाने त्या चुका शोधणे आणि दुरुस्त करणेही कठीण असते. डिजिटायझेशनमध्ये नोंदी तयार करून लगेचच सर्व संबंधितांसोबत फोनवर शेअर केल्या जातात. डिजिटायझेशनमुळे भविष्यात मतभेद कमी होतात.

आपण एमएसएमई व्यवसाय आणि वित्त क्षेत्रातील जितक्या अधिकाधिक बाबींचे डिजिटायझेशन करून तितकीच आपण या परिसंस्थेत अधिक कार्यक्षमता आणू शकू. डिजिटायझेशनने या समुदायाला दिलेला सगळ्यात मोठा लाभ म्हणजे प्रत्यक्ष कराव्या लागणाऱ्या कामातील वेळेची बचत. लेजर्स मांडणे, पेमेंट गोळा करणे आणि रोखीच्या व्यवस्थापनासारख्या कामांमध्ये ऑटोमेशन आणल्याने दररोज व्यापाऱ्यांचे अनेक तास वाचतात. कोणत्याही एमएसएमईसाठी वेळ हा फार महत्त्वाचा भाग असतो कारण ते आपल्या व्यवसायावर किती वेळ घालवतात यावर त्यांचं उत्पन्न अवलंबून असतं.

एमएसएमईसाठी डिजिटायझेशन फार महत्त्वाचं ठरलं आहे. मला वाटतं एमएसएमई समुदायाचं म्हणणं नीट ऐकून घेणं आवश्यक आहे. कारण, त्यांच्या व्यावसायिक कामकाजात भेडसावणारी कोणतीही समस्या ही छोटी नसते. आपण त्यांचं म्हणणं ऐकायला हवं, ते समजून घ्यायला हवं आणि योग्य पर्यायांच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी सोडवायला हव्यात. शिवाय, उत्पादनांमध्ये सातत्याने प्रयोग करत राहिल्याने या एमएसएमईच्या व्यावसायिक पद्धतींसाठी हे तंत्रज्ञान सुसंगत आहे की नाही, हेसुद्धा समजून घेता येईल. एमएसएमईजचा डिजिटल बदलांचा प्रवास सहजसोपा व्हावी ही जबाबदारी तंत्रज्ञान क्षेत्राची आहे.

(लेखक खाताबुक या अॅपचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

टॅग्स :व्यवसाय