Join us

प्रत्यक्ष कर संकलनामध्ये तब्बल 66 टक्क्यांनी वाढ; १.६८ लाख कोटी रुपयांचा झाला भरणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 5:46 AM

प्रथम तिमाही :प्राप्तिकर विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार १४ जूनपर्यंत जमा झालेल्या प्रत्यक्ष करांची रक्कम १.६८ लाख कोटी रुपयांवर  पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतीय अर्थव्यवस्था काहीशी डळमळीत झाली असली तरी पहिल्या तिमाहीमध्ये जमा झालेल्या प्रत्यक्ष करांची रक्कम १.६८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून त्यामध्ये मंगळवारी जमा झालेल्या कराच्या रकमेचा अद्याप समावेश झालेला नाही. सन २०१९-२०च्या पहिल्या तिमाहीशी तुलना करता ही वाढ ६६ टक्के आहे. 

प्राप्तिकर विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार १४ जूनपर्यंत जमा झालेल्या प्रत्यक्ष करांची रक्कम १.६८ लाख कोटी रुपयांवर  पोहोचली आहे. १५ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत पहिल्या तिमाहीसाठीच्या आगाऊ कराचा भरणा केला जाऊ शकतो. त्यामुळे या रकमेमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सन २०१९-२० या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये १.१ लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष करांची वसुली झाली होती. सन २०२०-२१ या वर्षामध्ये असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे पहिल्या तिमाहीतील करवसुली अगदीच कमी (९१,१६० कोटी रुपये) होती. त्या तुलनेमध्ये या वर्षामध्ये झालेली वाढ ही ८५ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे तुलनेसाठी सन २०१९-२० या वर्षाच्या आकडेवारीचा वापर केला जात असतो. 

पहिल्या तिमाहीमध्ये कंपनी करांचा भरणा ६२,२२९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सन २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीमध्ये हा कर १७,७८० कोटी रुपये एवढा जमा झाला होता. प्राप्तिकराची रक्कम ८१ हजार ७० कोटी रुपयांवरून १ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. पहिल्या तिमाहीमध्ये करांचे संकलन वाढण्याचा अर्थ अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बसलेला फटका हा त्या मानाने कमी आहे, असा होतो. 

मुंबईचा क्रमांक अव्वलचकर संकलनामध्ये मुंबईचा क्रमांक कायमच पहिला असतो. या तिमाहीमध्येही मुंबई सर्कलमधून ४९,६४६ कोटी रुपयांच्या कराचे संकलन झाले आहे. या वर्षामध्ये मुंबईमधून ३.४६ लाख कोटी रुपयांचे कर संकलन अपेक्षित असून त्याच्या १४.३१ टक्के रक्कम पहिल्या तिमाहीमध्ये जमा झाली आहे. मुंबई पाठोपाठ बंगळुरू सर्कलने २४,०२५ कोटी रुपयांचे कर संकलन केले आहे. दिल्ली (२१,२५४ कोटी), चेन्नई (११,५४४ कोटी) आणि हैदराबाद (११,३५१ कोटी) यांचे क्रमांक लागतात.

ॲडव्हान्स टॅक्स कोणासाठी? n चालू आर्थिक वर्षामधील आपले कर गणित जुळवून १० हजार रुपये अथवा त्यापेक्षा अधिक कर दायित्व असणाऱ्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागत असतो. जून, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च महिन्याची १५ तारीख ही त्या तिमाहीसाठी अंतिम असते. पगारदार आणि व्यावसायिक अशा दोघांनाही ॲडव्हान्स टॅक्सचा भरणा करता येतो. १५ जूनपर्यंत एकूण देय कराच्या १५ टक्के रक्कम भरावी लागत असते. 

टॅग्स :इन्कम टॅक्स