नवी दिल्ली : वित्तवर्ष २०२०-२१ मध्ये २.६१ लाख कोटी रुपयांचे परतावे (रिफंड) करदात्यांना दिल्यानंतर प्रत्यक्ष करांचे संकलन सुधारित अंदाजापेक्षा ४.४२ टक्क्यांनी वाढून ९.४५ लाख कोटी रुपयांवर गेले. सुधारित अंदाज ९.०५ लाख कोटी रुपये होता. असे असले तरी मागील वर्षातील प्रत्यक्ष करांच्या संकलनापेक्षा यंदाचे संकलन १० टक्क्यांनी घटले आहे. वित्त मंत्रालयाच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की, हंगामी आकडेवारीमध्ये २०२०-२१ वित्त वर्षातील एकूण प्रत्यक्ष करसंकलनात वाढ दिसून येत आहे. कोविड-१९ साथ आणि लॉकडाऊन या संकटांचा सामना करूनही या वर्षात प्रत्यक्ष करसंकलन वाढले हे विशेष आहे. महसूल सचिव तरुण बजाज यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते की, ‘फेब्रुवारी व मार्च २०२१ मध्ये प्रत्यक्ष करांचे संकलन चांगले राहिले. कॉर्पोरेट कर आणि वैयक्तिक प्राप्तिकर यांच्या संकलनात सुधारणा दिसून येत आहे. सुधारित अंदाजातील ९.०५ लाख कोटी रुपयांचा आकडा आम्ही नक्की पार करू, असे आकडेवारीवरून दिसते.’अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, औद्योगिक प्राप्तिकराचे (सीआयटी) संकलन ४.५७ लाख कोटी रुपये, तर रोख्यांच्या व्यवहारावरील करासह (एसटीटी) वैयक्तिक प्राप्तिकराचे (पीआयटी) संकलन ४.८८ लाख कोटी रुपये राहिले. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या वित्त वर्षातील सकल करसंकलन म्हणजे कर परतावे समायोजनापूर्वीचे संकलन १२.०६ लाख कोटी रुपये राहिले. विविध करांची रक्कमजमा झालेला एकूण अग्रीम कर ४.९५ लाख कोटी, टीडीएस ५.४५ लाख कोटी, स्व-समीक्षा कर १.०७ लाख कोटी, नियमित समीक्षा कर ४२,३७२ कोटी, लाभांश वितरण कर १३,२३७ कोटी आणि इतर कर २,६१२ कोटी रुपये राहिला.
सुखद धक्का! मोदी सरकारला अपेक्षेहून मोठा दिलासा; देशासाठी आनंदाची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 3:49 AM