टेस्लाच्या कार भारतीय बाजारात येणार की नाही, यावर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी टेस्लासंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. इकोनॉमिक टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत गडकरी यांनी इलॉन मस्क यांना टेस्लासंदर्भात स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. जेव्हा टेस्ला स्थानिक पातळीवर कार तयार करायला सुरुवात करेल. तेव्हाच तिचे भारतात स्वागत असेल,असे गडकरी यांनी म्हटले आहे.
...कुठल्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही - गडकरी म्हणाले, 'आम्ही भारतात टेस्लाचे स्वागत करतो. भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. येथे प्रत्येक प्रकारच्या कार विकणारे विक्रेते आहेत. जर टेस्लाने देशातच कार तयार केल्या, तर त्यांना सूट मिळेल.' अर्थात, गडकरी यांना स्पष्ट केले आहे की, जर टेस्ला आपल्या कार चीनमध्ये तयार करून त्यांची विक्री भारतात करणार असेल, तर कुठल्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. मुलाखती दरम्यान गडकरी यांना विचारण्यात आले होते की, भारतात कार निर्मितीला केव्हापासून सुरुवात होऊ शकते, तेव्हा ते म्हणाले, चीनमध्ये तयार केल्यास कुठल्याही प्रकारची सूट मिळणार नाही.
आयात शुल्क 15% पर्यंत कमी करण्याचा प्लॅन -सरकार टेस्लाला सूट देण्यासंदर्भात विचार करत आहे, असा दावा काही दिवसांपूर्वी एका वृत्तात करण्यात आला होता. ग्रीन कारच्या आयातीवर लागणारे शुल्क 100% वरून 15% करण्याचे प्लॅनिंगवर सुरू आहे, असेही यात म्हणण्यात आले होते. एलन मस्क यांच्या टेस्लाने सर्वप्रथम 2021 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) आयात शुल्क संपवण्यासंदर्भात भाष्य करत भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता सरकार 15 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावण्यासंदर्भात विचार करत आहे.