Join us

ई-कॉमर्स कंपन्यांना डिस्काऊंटचा फटका

By admin | Published: February 16, 2015 12:32 AM

विक्रीवर डिस्काऊंट दिल्यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांना १ हजार कोटींचा फटका बसला असल्याचे पीडब्ल्यूसीने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले

मुंबई : विक्रीवर डिस्काऊंट दिल्यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांना १ हजार कोटींचा फटका बसला असल्याचे पीडब्ल्यूसीने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले. विक्रीवर डिस्काऊंट देणे हे ई-कॉमर्स कंपन्यांसाठी दीर्घ काळपर्यंत व्यावहारिक असणार नाही, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. आॅनलाईन खरेदी-विक्रीला चालना मिळावी यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांनी सुरुवातीच्या काळात दिलेली विक्रीवरील सूट योग्यच होती. मात्र, हेच धोरण दीर्घकालीन व्यूहरचना म्हणून अव्यवहार्य आहे. कमी किमतीत माल विकणे व्यवसायाच्या दृष्टीने कुठल्याही परिस्थितीत हितावह नाही. तसेच कमी किमती ठेवून ग्राहकांना दीर्घ काळासाठी टिकवून ठेवणेही शक्य होणार नाही. डिस्काऊंटमधील व्यवसाय आणखी काही महिने चालू ठेवता येऊ शकतो. त्यानंतर ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी कंपन्यांना नवी काही तरी करावे लागेल, असे या अहवालात म्हटले आहे.अहवालानुसार, कंपन्यांनी डिस्काऊंटच्या माध्यमातून आजपर्यंत १ हजार कोटी रुपये गमावले आहेत. ही रक्कम कधीपासूनची आहे, याबाबतची माहिती मात्र देण्यात आलेली नाही. पीडब्ल्यूसीने केलेल्या अभ्यासात १,00५ ग्राहकांनाही सहभागी करून घेण्यात आले होते.