मुंबई : नरेंद्रभाई तो बिना वजह किसिको चाय भी नही पिलाते.. ‘‘हम चाहते तो है, की नरेंद्रभाई प्रधानमंत्री होने जा रहे है, तो परिवारका भी कुछ भला हो. हमारे बच्चोंका छोटा-बडा कारोबार चले. लेकिन हम जानते है, की ऐसा कुछ नही होगा. नरेंद्रभाई तो बिना वजह किसिको चाय भी नही पिलाते, परिवारके लोगोंको तो बिल्कुलही नही.. तो छोडही दीजिये आप’’ - बीबीसी वर्ल्ड नावाच्या इंग्रजी वाहिनीवर नरेंद्र मोदींचे धाकटे बंधू प्रल्हादभाई ऐंंंडर्यू नॉर्थ या ‘बिदेसी’ पत्रकाराशी हिंदीत बोलत असतात. सोबत एक दुभाषी. भारतीय राजकारणाचे प्राथमिक धडे गिरवणारा बीबीसीचा तो तरुण वार्ताहर इंग्रजी अर्थ कळल्यावर काहीसा सटपटतो. तेवढ्यात प्रल्हादभाई म्हणतात, ‘‘बचपनमे हम लोग पतंग उडाने जाते थे, तो उन्होने कभी किसीको जीतने नही दिया. अभी भी ऐसाही होगा, अगर अब वो चल पडे है, तो किसीको अपने मार्गमे आने नही देंगे’’- दुभाषी या कौतुकाचा इंग्रजी अर्थ सांगतो. - इज दॅट व्हॉट धीस हिन्दु नैशनलिस्ट गोइंग टू डू टू इंडिया?’’: बीबीसीची दिल्लीतली अँकर प्रश्न विचारून सेगमेंट संपवणार, तेवढ्यात वडोदरातल्या मोदींच्या घरासमोर जमलेले भाजपाचे कार्यकर्ते झेंडूच्या फुलांनी सजवलेले मोठे कमळ उंच उचलतात आणि मोदींच्या जयजयकारात तो कळीचा प्रश्न विरून जातो. शुक्रवारी पहाटेपासूनच सज्ज झालेली भारतीय माध्यमे सेकंदासेकंदांची बातमी देशभरात पोहोचवत असताना बीबीसी, सीएनएन, अल जजीरासारख्या प्रमुख विदेशी वाहिन्याही भारतीय निवडणुकांच्या निकालावर अखंड नजर ठेवून होत्या. गेली सहा दशके देशाच्या राजकारणावर वरचष्मा असलेल्या गांधी परिवाराच्या आटलेल्या करिष्म्याबद्दलचे आश्चर्य, ’न-रे-न-द-र मोडी’ नावाच्या ’एक्स्ट्रिमिस्ट हिंदू नॅशनॅलिस्ट’ नेत्याला मिळालेल्या अलोट बहुमतामागची कारणे मांडताना या वाहिन्यांच्या भारतातल्या प्रतिनिधींना करावी लागलेली मुद्यांची जुळवाजुळव आणि भारतासारख्या प्रमुख अर्थव्यवस्थेला मिळू घातलेल्या राजकीय स्थैर्याचा जागतिक अर्थव्यवहारावर होणारा सकारात्मक परिणाम हे या वाहिन्यांच्या वार्तांकनातले ठळक मुद्दे होते. बीबीसी आणि सीएनएनबरोबरच अल जजीरावरदेखील भारतीय निवडणुकीच्या ब्रेकिंग न्यूजला महत्त्वाचे स्थान मिळत असताना पाकिस्तानी वाहिन्यांनी (निदान संध्याकाळपर्यंत) धरलेली मिठाची गुळणी मात्र विशेष लक्षणीय होती. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा झाल्यापासून पाकिस्तानवर ओढवू घातलेल्या संभाव्य अरिष्टाचे ढोल बडवणारी आणि हफीज सईदसारख्यांना स्टुडिओत बोलावून भारताविरुद्ध गरळ ओकण्याची संधी देणारी पाकिस्तानातली माध्यमे निवडणूक निकालाच्या दिवशी शेजारच्या देशाकडे ‘शंके’च्या नजरेने पाहताना दिसली. भारताच्या राजकीय पटलावर पाकिस्तानविरोध अधिक तीव्र होण्याच्या धास्तीने पाकिस्तानातले जनमत आणि माध्यमे काहीशी चिंताक्रांत झालेली दिसत असल्याचे निरीक्षण अल जजीरावर सातत्याने नोंदवले गेले. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने चीन आणि जपानशी अधिक जवळीक साधली तसेच अफगाणिस्तानातील घडामोडीत सक्रिय सहभाग घेतला, तर पाकिस्तानच्या राजकीय भवितव्याला हादरे बसू शकतात, या शक्यतेभोवती या चर्चा प्रामुख्याने फिरत राहिल्या. (विशेष प्रतिनिधी)
विदेशी वाहिन्यांवर मोदी करिष्म्याची चर्चा
न-रे-न-द-र मोडी’ नावाच्या ’एक्स्ट्रिमिस्ट हिंदू नॅशनॅलिस्ट’ नेत्याला मिळालेल्या अलोट बहुमतामागची कारणे मांडताना या वाहिन्यांच्या भारतातल्या प्रतिनिधींना करावी लागलेली मुद्यांची जुळवाजुळव आणि भारतासारख्या प्रमुख अर्थव्यवस्थेला मिळू घातलेल्या राजकीय स्थैर्याचा जागतिक अर्थव्यवहारावर होणारा सकारात्मक परिणाम हे या वाहिन्यांच्या वार्तांकनातले ठळक मुद्दे होते.
By admin | Published: May 17, 2014 05:15 AM2014-05-17T05:15:32+5:302014-05-17T09:09:05+5:30