बंगळुरू : कारभारात अधिक टोकदारपणा यावा यासाठी आयटी क्षेत्रातील बडी कंपनी इन्फोसिसने आपल्या चार मुख्य उद्योग खंडांची १५ छोट्या शाखांत विभागणी केली आहे. कंपनी अध्यक्षांना कंपनीच्या अंतर्गत कारभाराऐवजी व्यवसायवाढीकडे लक्ष देता यावे, यासाठी ही योजना करण्यात आली आहे.
कंपनीचे सीओओ यू. बी. प्रवीण राव यांनी कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवून ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक छोटी शाखा सुमारे ५00 ते ७00 दशलक्ष डॉलर महसूल क्षमतेची असेल. प्रत्येक शाखेचा स्वतंत्र अध्यक्ष असेल तसेच नफ्या तोट्याची जबाबदारी कोणाची हेही निश्चित असेल. कंपनीच्या चार उद्योग खंडांत ३ अब्ज डॉलरचा महसूल देणारी बँकिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स (बीएफएसआय), २.३ अब्ज डॉलरचा महसूल देणारी रिटेल अँड लाइफ सायन्सेस, २.२ अब्ज डॉलरचा महसूल देणारी मॅन्युफॅक्चरिंग अँड हाय टेक आणि १.९ अब्ज डॉलरचा महसूल देणारी एनर्जी अँड युटिली, कम्युनिकेशन्स अँड सर्व्हिसेस यांचा समावेश आहे.
बीएफएसआयचे चार भागांत विभाजन करण्यात आले आहे. त्यावर चार प्रमुखांची निवड करण्यात आली आहे. ते कंपनीचे अध्यक्ष आणि फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख मोहित जोशी यांना रिपोर्ट करतील. हेल्थ केअर अँड लाइफ सायन्सेसचे स्वतंत्र युनिट असेल. विप्रोतून नुकत्याच इन्फोसिमध्ये आलेल्या संगिता सिंग त्याच्या प्रमुख असतील.
एनर्जी अँड युटिलिटीज, कम्युनिकेशन्स अँड सर्व्हिसेसचे तीन भागांत विभाजन करण्यात आले आहे. या शाखांचे प्रमुख अध्यक्ष राजेश कृष्णमूर्ती यांना रिपोर्ट करतील. मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, सीपीजी अँड लॉजिस्टिक (एमआरसीएल) यांचे प्रमुख अध्यक्ष संदीप ददलानी तसेच नितेश बंगा यांना रिपोर्ट करतील. डिलिव्हरी क्षेत्रात डिजिटल एक्सपिरिअन्स सर्व्हिस लाइन, क्लाउड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स आणि डाटा अँड अॅनॅलिटिक्स सर्व्हिस लाइन अशा शाखा असतील. यांचे प्रमुख अध्यक्ष रवी कुमार यांना रिपोर्ट करतील. (वृत्तसंस्था)
इन्फोसिसच्या चार उद्योग खंडांची १५ शाखांत विभागणी
आयटी क्षेत्रातील बडी कंपनी इन्फोसिसने आपल्या चार मुख्य उद्योग खंडांची १५ छोट्या शाखांत विभागणी केली आहे.
By admin | Published: October 18, 2016 06:42 AM2016-10-18T06:42:59+5:302016-10-18T06:42:59+5:30