Online Shopping Scams : देशभरात दिवाळीची तयारी जोरात सुरू आहे. लोक घराच्या साफसफाई पासून विविध वस्तू खरेदी करण्यात व्यस्त आहेत. सध्या बाजारपेठांमध्ये तुडूंब गर्दी पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाइटवर आकर्षक ऑफर्स मिळत आहे. अशा स्थितीत सरकारने या दिवाळीत ऑनलाइन शॉपिंग घोटाळ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सणासुदीत लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॉपिंग करत असतात. याचाच गैरफायदा घेत सायबर भामटे लोकांची बँक अकाउंट रिकामी करत आहेत.
फिशिंग स्कॅमचा सर्वाधिक वापर
भारत सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) जारी केलेल्या रिपोर्टनुसार सायबर फसवणूक करणारे लोक फिशिंग स्कॅमचा (Phishing Scam) सर्वाधिक वापर करत आहेत. यामध्ये ते लोकांना बनावट ईमेल आणि मेसेजच्या माध्यमातून जाळ्यात ओढतात. नंतर त्यांचा लॉगिन आयडी आणि वैयक्तिक डेटा चोरुन आर्थिक गंडा घालतात. याशिवाय लॉटरी स्कॅम (Lottery Scam) आणि प्राईज स्कॅम (Prize Scam) ही त्यांची शस्त्रे आहेत. ऑनलाइन डेटिंग प्रोफाईल घोटाळा (Online Dating Scam) देखील या दिवसात खूप वाढला आहे.
सरकारचे नागरिकांना आवाहन
सरकारी संस्था Cert In ने या घोटाळ्यांचीच लिस्ट जारी केली आहे. यामध्ये तुम्हाला जॉब स्कॅम, टेक सपोर्ट स्कॅम, इन्व्हेस्टमेंट स्कॅम, कॅश ऑन डिलिव्हरी स्कॅम, फेक चॅरिटी स्कॅम, मनी ट्रान्सफर स्कॅम, डिजिटल अरेस्ट स्कॅम, फोन स्कॅम, पार्सल स्कॅम, लोन स्कॅम आणि कार्ड स्कॅम अशा कुठल्यागी घोटाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
अशा स्कॅमपासून कसे दूर रहायचं?
Cert In नुसार, तुम्ही अनोळखी लोकांशी कॉल किंवा व्हिडिओ कॉलवर कनेक्ट होऊ नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करू नका. कोणतीही सरकारी संस्था WhatsApp किंवा Skype द्वारे कोणतेही अधिकृत काम करत नाही. तुम्हाला ब्लॅकमेल किंवा पैशाचं आमिष देऊन तुमची वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा गोष्टींपासून चार हाथ लांब राहा. कोणतीही सरकारी संस्था कधीही बँकिंग तपशील आणि OTP सारख्या गोष्टींची मागणी करत नाही. कोणीही पाठवलेले कोणतेही अॅप किंवा सॉफ्टवेअर कधीही इन्स्टॉल करू नका किंवा पैसे ट्रान्सफर करू नका.