नवी दिल्ली - श्रावण महिना सुरू हाेताच देशात सणासुदीचे वेध लागतात. गणेशाेत्सव, नवरात्र आणि दिवाळीच्या निमित्ताने देशभरात माेठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. देशाच्या अर्थचक्राला गती देणाऱ्या सणासुदीच्या हंगामासाठी कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सणासुदीपूर्वीच हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढली आहे. यावर्षी ७ लाखांपेक्षा जास्त हंगामी कामगारांची भरती हाेण्याची अपेक्षा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा त्यात ७५ टक्के एवढी माेठी वाढ हाेण्याचा अंदाज आहे.
लाॅजिस्टिक्स, वेअर हाऊसिंग, डिलिव्हरी इत्यादी क्षेत्रात नाेकऱ्या वाढणार आहेत. सणासुदीचा अंदाज घेऊन कंपन्या चांगल्या पगारासह ४-५ पट इन्सेंटिव्हदेखील देण्याच्या तयारीत आहेत.
आयटी क्षेत्र देणार गुड न्यूज?
गेल्यावर्षीपासून आयटी क्षेत्रात लाखाे कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ आली. यावेळी आयटी आणि टेक कंपन्या डिसेंबर तिमाहीपर्यंत बंपर भरती करतील, असा अंदाज आहे. ४४ टक्के नाेकर भरती आयटी क्षेत्रात वाढेल, असा अंदाज मॅनपाॅवर एम्प्लाॅयमेंट आऊटलूक सर्वेक्षणातून व्यक्त केला आहे.
ई-काॅमर्स, सप्लाय चेनमध्ये मागणीत प्रचंड वाढ
ई-काॅमर्स क्षेत्रात डिलिव्हरीसाठी कर्मचाऱ्यांची मागणी ४० टक्क्यांनी वाढली आहे. या क्षेत्रातील तसेच लाॅजिस्टिक कंपन्या हजाराेंच्या संख्येने हंगामी कर्मचारी भरती करत आहेत. त्यात बहुतांश नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने हाेतील, असे तज्ज्ञांनी सांगितले.
- ७ ते ८ लाख नाेकऱ्या पार्टटाईम, तात्पुरत्या आणि हंगामी कर्मचाऱ्यांना मिळू शकतात.
- २३ टक्के भरती यापैकी झालेली आहे.
- ४ लाख लाेकांना २०२२ मध्ये हंगामी नाेकऱ्या मिळाल्या हाेत्या.
- २० ते २५ टक्के
ई-काॅमर्स क्षेत्रातील विक्री वाढण्याची अपेक्षा आहे.
- ६९ टक्के कंपन्या अस्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकतात.
- २० टक्के कंपन्या हंगामी कर्मचाऱ्यांना नियुक्त करतील.
- १८ टक्के नाेकर भरतीत वाढ डिसेंबरमध्ये कंपन्या करू शकतात.
१५% कर्मचाऱ्यांची मागणी वाढली वेअर हाऊसिंग क्षेत्रात.
४०% वाढ डिलिव्हरी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मागणीत झाली आहे.
४०% लाॅजिस्टिक क्षेत्रात हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढणार आहे.
६४ हजार लाेकांना ब्रॅंडेड रिटेल कंपन्यांनी यावर्षी नाेकरी दिली आहे. ७३ टक्के जास्त भरती वर्ष २०२२च्या तुलनेत.