Join us

दिवाळी सुरू झाली; तरी बाजार लक्ष्मीच्या प्रतीक्षेत!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 3:49 AM

बाजारात रोख रकमेचा तुटवडा असल्यामुळे दिवाळी सुरू होऊनही खरेदीमध्ये तब्बल ४0 टक्के घसरण झाली आहे, असा दावा कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (काइट) या व्यापारी आणि व्यावसायिकांच्या संघटनेने केला आहे.

नवी दिल्ली : बाजारात रोख रकमेचा तुटवडा असल्यामुळे दिवाळी सुरू होऊनही खरेदीमध्ये तब्बल ४0 टक्के घसरण झाली आहे, असा दावा कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (काइट) या व्यापारी आणि व्यावसायिकांच्या संघटनेने केला आहे. रोख रकमेच्या टंचाईमुळे बाजारात गर्दीच नाही, असे काइटने म्हटले आहे.काइटच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, मुख्य दिवाळीला आता फक्त तीन दिवस बाकी असताना देशभरातील बाजार निस्तेज आहेत.बाजारपेठांत गर्दीचा अभाव आहे. उत्सवी वातावरणाचाही अभाव दिसून येत आहे. ग्राहकांची फार कमी पावले दुकानांकडे वळत आहेत. याचा परिणाम म्हणून गेल्यावर्षीच्या तुलनेत विक्रीत थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ४0 टक्के घट झाली आहे. बाजारांत गर्दी कमी असण्यामागे मुख्य कारण रोख रकमेची टंचाई हेच आहे, असे नमूद करून काइटने म्हटले की, रोख रकमेच्या टंचाईप्रमाणेच वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) फटकाही बाजाराला बसला आहे. १ जुलै रोजी लागू झालेल्या जीएसटीमुळे मंदी कैकपटीने वाढली आहे.निवेदनात म्हटले आहे की, जीएसटीच्या बाबतीत अजूनही प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. अनेक बाबतीत स्पष्टता नसल्यामुळे व्यापाºयांना त्रास होत आहे. याच महिन्यात सर्व करांची अंमलबजावणी पूर्णांशाने सुरू झाली आहे.सूत्रांनी सांगितले की, दिवाळी तोंडावर आलेली असताना गेल्या आठवड्यापर्यंत बाजारांत पूर्णत: शुकशुकाट होता. आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत मॉल आणि ब्रँडेड कापडांच्या बाजारपेठेत खरेदीत वाढ झाल्याचे वृत्त आले होते. आदल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ १५ ते २0 टक्के असल्याचे काही मॉल आणि रिटेल क्षेत्रातील अन्य काही व्यावसायिकांनी सांगितले होते.गेल्या सप्ताहाच्या अखेरीस दुकानांत गर्दी दिसू लागली असतानाच नव्या आठवड्याला सुरुवात होताच ही गर्दी पुन्हा एकदा ओसरली आहे. लक्ष्मीपूजन गुरुवारी आहे. बाजाराला मात्र अजून लक्ष्मीची प्रतीक्षाच आहे.

टॅग्स :दिवाळीबाजारजीएसटी