नवी दिल्ली - कामगार मंत्रालयाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिवाळीपूर्वीच दिवाळी भेट दिली आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2 वर्षे मोफत विमानप्रवास करता येणार आहे. सरकारने एलटीसी योजनेच्या मुदतीत दोन वर्षांची वाढ केली आहे. त्यामुळे आता 2020 पर्यंत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत विमानाची सैर करता येणार आहे.
कामगार आणि प्रशिक्षण मंत्रालयाने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना उत्तर पूर्व क्षेत्र, अंदमान-निकोबार बेटांवर मोफत विमानाने जाता येईल. 26 सप्टेंबर 2018 ते 25 सप्टेंबर 2020 पर्यंत या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना घेता येईल. सरकारने 2014 मध्ये एलटीसी योजनेला मंजुरी दिली होती. त्यानुसार ही विमानसेवा पुरविण्यात येत आहे. आता, मोदी सरकारकडून या योजनेला आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, एलटीसी योजना म्हणजे लीव्ह ट्रॅव्हल स्कीम होय. उपलब्ध माहितीनुसार 48.81 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.