नवी दिल्ली - दिवाळीपूर्वीच भारतीय नागरिकांनी चीनचं दिवाळं काढलं आहे. दिवाळीपूर्वीच चीनला मोठा आर्थिक फटका बसला असून देशात चायना सामानावर टाकण्यात आलेल्या बहिष्कारामुळे चीनचं जवळपास 50 हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कैट) म्हटलंय की, देशात चायना मालावर बहिष्कार करण्याचं आवाहन केल्यामुळे यंदाच्या सण उत्सवाच्या तोंडावर चीनला व्यापारात 50 हजार कोटीचं आर्थिक नुकसान झालं आहे.
यंदाच घरगुती स्तरावर ग्राहकांमध्ये वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी रुपयांचा अंदाज आहे. कॅटने आज जारी केलेल्या विधानानुसार, देशभरात ग्राहकांची बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे, त्यामुळेच व्यापारी वर्गाला एका मोठ्या आर्थिक उलाढालीची अपेक्षा यंदाच्या उत्सावातील खरेदी-विक्रीतून आहे. दिवाळी कालावधीतील खरेदी-विक्री व्यवहारातून यंदाच्या वर्षी 2 लाख कोटी रुपयांची भर अर्थव्यवस्थेत पडेल, असा अंदाज कॅटने व्यक्त केला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही कॅटने चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं असून देशातील व्यापारी आणि आयातकर्त्यांनी चीनमधून आयात बंद केली आहे.
देशात चीनी मालाची आयात बंद केल्याने चीनला तब्बल 50 हजार कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे गेल्या वर्षभरापासून ग्राहकांनीही चायना मालाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, स्वदेशी, भारतीय सामानास बाजारात चांगली मागणी होत आहे.