Join us

दिवाळीत चॉकलेटची दणदणीत विक्री, शीतपेये थंडावली, केक-पेस्ट्रीची विक्रीही जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 6:29 AM

मुंबई : यंदा दिवाळीमध्ये चॉकलेट, केक-पेस्ट्री यांची दणदणीत विक्री झाली आहे. मात्र, त्या तुलनेत गृहोपयोगी वस्तू, शीतपेये यांच्या विक्रीमध्ये ...

मुंबई : यंदा दिवाळीमध्ये चॉकलेट, केक-पेस्ट्री यांची दणदणीत विक्री झाली आहे. मात्र, त्या तुलनेत गृहोपयोगी वस्तू, शीतपेये यांच्या विक्रीमध्ये मात्र घट झाल्याची माहिती एका सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. दहा वर्षांत प्रथमच असा ट्रेन्ड दिसून आल्याचे मत एफएमसीजी क्षेत्राशी निगडित या सर्वेक्षणाद्वारे नोंदविण्यात आले आहे.

देशातील ७५ लाख लहान-मोठे व्यापारी तसेच किराणा व्यापारी यांच्याशी निगडित असलेल्या एका संकेतस्थळाने यासंदर्भात सर्वेक्षण केले असून त्याद्वारे दिवाळीतील खरेदी-विक्रीच्या नवा ट्रेन्डची माहिती पुढे आली आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये प्रामुख्याने, स्वतःच्या घरच्या खरेदीसाठी अथवा भेट देण्यासाठी अनेक लोक गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करतात. त्याचसोबत शीतपेयांची खरेदीही जोरात होते.

त्याचसोबत विविध पॅकेज्ड फूड किंवा मिठाई यांनाही मोठी मागणी असते. मात्र, या सर्व नित्याच्या खरेदीला मोठ्या प्रमाणावर ब्रेक लागला असून शीतपेयांच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २३ टक्क्यांची घट नोंदली गेली आहे तर, वैयक्तिक/गृहोपयोगी वापराच्या वस्तूंच्या खरेदीमध्ये देखील १८ टक्क्यांची घट आहे. 

कारण काय ?-   या तुलनेत यंदा चॉकलेट, केक आणि पेस्ट्री यांची मागणी मात्र मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या तिन्ही घटकांत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.     यंदाच्या वर्षी महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ही विक्री वाढल्याचा मतप्रवाह आहे. दोन वर्षे कोरोनामुळे सारेच व्यवहार थंडावले होते. त्यात यंदा महागाई आणि अनेकांनी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आपल्या उत्पादनांच्या किमती वाढविल्यामुळे त्याचा फटका या वस्तूंच्या विक्रीला बसला आहे.    दिवाळीनिमित्त गोड पदार्थ भेट म्हणून घेऊन जाण्याकडे लोकांचा कल असतो. तसेच, काही घरगुती वापराच्या लहानमोठ्या वस्तूही भेट म्हणून दिल्या जातात.  मात्र, गोड पदार्थांच्या आणि या वस्तूंच्या किमतीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किमान १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्यामुळे अनेक लोकांनी या घटकांची खरेदी करणे टाळले.    सध्याची महागाईची स्थिती लक्षात घेता सणासुदीचे दिवस असूनही लोक खरेदी करताना अत्यंत विचारपूर्वक करत असल्याचे मत यामध्ये नोंदविण्यात आले आहे.

टॅग्स :व्यवसाय