नवी दिल्ली : मुंबई : जगभरातील बाजारांमध्ये असलेल्या तेजीमुळे भारतातील शेअर बाजारही उसळले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ७२४ अंशांनी वाढला, तर निफ्टीने १२ हजार अंशांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे शेअर बाजार नऊ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. गुरुवारी शेअर बाजार सुमारे १५० अंशांनी वाढून सुरू झाला. त्यानंतर दिवसभरामध्ये त्यात वाढ होताना दिसून आली. जगभरातील शेअर बाजारांमध्ये अमेरिकन अध्यक्ष पदाबाबत अनिश्चितता कायम असतानाही मोठी वाढ झालेली दिसून आली. दिवसअखेर संवेदनशील निर्देशांक ७२४.०२ अंश म्हणजेच १.७८ टक्क्यांनी वाढून ४१,३४०.१६ अंशांवर बंद झाला. याआधी फेब्रुवारी महिन्यात सेन्सेक्सने ४१ हजार अंशांचा टप्पा ओलांडला होता. राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही मोठ्या प्रमाणावर खरेदीचा उत्साह दिसून आला. त्यामुळे येथील निर्देशांक (निफ्टी)ने १२ हजार अंशांचा टप्पा ओलांडण्यामध्ये यश मिळविले आहे. दिवसअखेर निफ्टी २११.८० अंश म्हणजे २११.८० अंशांनी वाढून १२,१२०.३० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्येही वाढ दिसून आली.
शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स, निफ्टी उसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 1:41 AM