नवी दिल्ली : ऐन दिवाळीच्या दिवसांत चमचमीत खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या डाळी स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. तसेच हे दर पुढील सहा महिने स्थिर राहण्याचे संकेत आहेत. सरकारी गोदामांमध्ये असलेला डाळींचा मुबलक साठा आणि बाजारात येणारे ताजे उत्पादन यामुळे नोव्हेंबरमध्ये ऐन दिवाळीत डाळी आणखी स्वस्त होण्याचे संकेत दिसत आहेत. देशात सध्या किरकोळ बाजारात तूरडाळ १५२ रुपये प्रतिकिलो तर उडीद डाळ ११९.७० रुपये प्रतिकिलो इतकी आहे.
मागील चार महिन्यात सरकारने १.६ लाख मेट्रिक टन तूरडाळ बाजारात उतरविली. किमती स्थिर राहाव्यात यासाठी सरकारने म्यानमार, पूर्व आफ्रिकेतील देशांमधून आयात सुरु केली आहे. तूरडाळीची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. ग्राहकांना डाळी मिळण्यात अडचणी येणार नाहीत, याबाबत सरकार दक्ष आहे. २०२३ च्या अधिसूचनेनुसार सध्या तूर आणि उडदाच्या डाळीवर आयात शुल्क लावले जात नाही. (वृत्तसंस्था)
कमी पडण्याची चिंता नाही
म्यानमार, मलावी, मोझाम्बिक, टांझानिया या देशांतून मुख्यत्वे डाळींची आयात केली जाते. म्यानमार आणि संयुक्त अरब आमिरात या देशांकडून मोठ्या प्रमाणात डाळ खरेदी केली जाते. ज्या देशांमधून भारतात मोठ्या प्रमाणावर डाळींची आयात केली जाते तिथे यंदा डाळींचे उत्पादन चांगले होईल, असा अंदाज आहे. या वर्षात २४ लाख टन डाळींची आयात केली आहे.
सरकारी गोदामात ४० लाख मेट्रिक टनांचा साठा
डाळीच्या लागवडीखालील क्षेत्र मागील वर्षांच्या तुलनेत यंदा ६ टक्क्यांनी घटले असले तरी सरकारला आशा आहे की, नोव्हेंबरमध्ये बाजारात येणाऱ्या मालामुळे डाळींच्या किमती कमी होतील. केंद्र सरकारच्या गोदामात सध्या ४० लाख मेट्रिक टन इतका डाळींचा साठा उपलब्ध आहे. ग्राहकांना गरज भासली असता सरकारकडून या डाळीचे वितरण केले जाऊ शकते. मागच्या हंगामात जोरदार खरेदी केल्याने सरकारकडे डाळींचा मोठ्या प्रमाणात बफर साठा उपलब्ध आहे. दरांच्या नियंत्रणासाठी सरकार योग्य वेळी हा साठा बाजारात आणू शकते.