Join us

DMart ने डिसेंबरच्या तिमाहीत कमावला ५५३ कोटींचा नफा; नोंदवली २४ टक्क्यांची मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 3:30 PM

३१ डिसेंबर २०२१ अखेर देशभरात DMart ची २६३ स्टोअर आहेत.

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात अनेक उद्योग बंद पडल्याचे पाहायला मिळाले. मात्र, असेही काही उद्योग, व्यवसाय होते, ज्यांनी दमदार कामगिरी करत घसघशीत नफा कमावला. दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक राधाकिशन दमानी यांची मालकी असलेल्या डीमार्ट (DMart) कंपनीने डिसेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत तब्बल ५५३ कोटीचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नफ्यात २४ टक्के वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा फटका सर्वांना बसला होता. गेल्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत करोना संकटातून सावरत अर्थव्यवस्था बाहेर पडली. टप्याटप्यात निर्बंध हटण्यात आले आणि मॉल खुले करण्यात आले. त्याचा फायदा डीमार्टला झाला असल्याचे दिसून आले. याशिवाय कंपनीला तिसऱ्या तिमाहीत ९२१८ कोटींचा महसूल मिळाला आहे.

सन २०२० मध्ये ४४७ कोटींचा नफा 

डीमार्टला सप्टेंबर ते डिसेंबर २०२० मध्ये ४४७ कोटींचा नफा झाला होता तर ७५४२ कोटींचा महसूल मिळाला होता. यंदा नफ्यात २४ टक्के आणि महसुलात २२ टक्के वाढ झाली असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे. ३१ डिसेंबर २०२१ अखेर देशभरात डीमार्टची २६३ स्टोअर आहेत. जनरल वस्तू आणि तयार कपड्यांची मागणीत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.  

टॅग्स :व्यवसाय