नवी दिल्ली : दोन्ही बाजूचे परस्पर सामंजस्य आणि सहकार्य यामुळे विवाहात निर्माण झालेले नाते टिकत असते. परंतु, काही निमित्ताने वाद विकोपाला जातो, पत्नीला मिळालेले दागिने, साड्या, भेटवस्तू कुणाच्या यावरून भांडणे सुरू होतात. पत्नी या वस्तू परत मागू लागते, मात्र सासरची मंडळी नकार देतात. त्यामुळे स्त्रीधन म्हणजे काय, त्यावर अधिकार कुणाचा, यावर पती दावा करू शकतो का, आदी अनेक प्रश्न निर्माण होतात. जाणून घेऊया कायदा याबाबत नेमके काय सांगतो.
स्त्रीधन म्हणजे नेमके काय?
महिलेला विवाहावेळी देण्यात आलेल्या वस्तू, दागिने, साड्या, नातेवाइकांकडून मिळालेल्या भेटवस्तू आदींचा समावेश स्त्रीधनात होतो. यामध्ये भेट म्हणून दिलेल्या मालमत्तेचाही समावेश होतो. भेटवस्तू माहेरकडून मिळालेल्या असो वा सासरकडून दोन्हींचा समावेश स्त्रीधनात होतो.
कुणालाही दाव्याचा अधिकार नाही
हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ आणि हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार महिलेला स्त्रीधन आपल्याकडे ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. स्त्रीधनाचा वापर ती कसाही करू शकते. ते ती कुणालाही देऊ शकते तसेच विकूही शकते.
सासरची मंडळी तसेच पतीचा या स्त्रीधनवर काहीही अधिकार नसतो. महिलेने स्त्रीधन सासरची कुणाही व्यक्ती पती, सासू किंवा सासरे यांना ठेवण्यासाठी दिले असले तरी ते केवळ स्त्रीधन रक्षणकर्ते ठरतात. महिलेने स्त्रीधनाची मागणी केली असता त्यांना
नकार देता येत नाही. तिला ते परत द्यावेच लागते.
स्त्रीधन परत करण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिला तर महिला पोलिसांत तक्रार करू शकते. पतीपासून विभक्त झाल्याच्या स्थितीत महिला कायद्याने स्त्रीधन सोबत घेऊन जाऊ शकते.
मृत्यूनंतर स्त्रीधनावर कुणाचा अधिकार?
स्त्रीधनावर महिलेचा एकाधिकार असतो. मृत्यूनंतर ते कुणाला मिळावे हे तिच्या मृत्युपत्रावर अवलंबून असते. मृत्युपत्र न करता निधन झाल्यास त्या महिलेच्या वारसदारांमध्ये स्त्रीधनाचे वाटप केले जाते.
सुप्रीम कोर्टाचे आदेश काय?
केरळच्या एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आदेशात स्पष्ट म्हटले होते की, संकटात पत्नीच्या स्त्रीधनाचा वापर करता येईल; परंतु हे धन परत करणे ही पतीची जबाबदारी आहे. यावर दोघांचा संयुक्त अधिकार नसतो.