मुंबई - सध्या मार्केट आणि गुंतवणुकदारांमध्ये बिटकॉइनबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. लवकरात लवकर पैसे कमावण्यासाठी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याबद्दल चर्चा सुरु आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मात्र पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना सतर्क करत बिटकॉइनपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. बिटकॉइनच्या प्रलोभनाला बळी पडू नका असं आवाहन आरबीआयने केलं आहे. आरबीआयने सावधानता बाळगण्याचा सल्ला देण्याची ही तिसरी वेळ आहे.
बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते.
रिजर्व बैंक ने बिटकॉइन सहित वर्चुअल करेंसी के जोखिम के संबंध में सावधान कियाhttps://t.co/vDVfclevyo
— ReserveBankOfIndia (@RBI) December 5, 2017
आरबीआयने बिटकॉइनमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी अद्याप मान्यता दिली गेली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. अशा परिस्थितीत व्हर्चुअल करन्सीत ट्रेड करणं धोकादायक ठरु शकतं. गेल्या आठवड्यात एका बिटकॉईनचे मूल्य तब्बल 11 हजार डॉलर्सवर पोहोचले होते. ज्यामुळे सर्वांनाच धक्का दिला होता. आज हे मूल्य 12 हजार डॉलर्सवर पोहोचलं आहे.
बिटकॉइनद्वारे रिअल इस्टेटमध्ये ब्लॅक मनी?
रिअल इस्टेट व्यवसायाला बिट कॉईनच्या व्हर्चुअल करन्सीने नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांकडून हाती आली आहे. अनिवासी भारतीयांची यात मदत घेतली जात आहे. नोटाबंदीनंतर थंडावलेल्या व्यवसायाला बिटकॉईनच्या माध्यमातून पुन्हा बहर आण्याचे प्रयत्न सुरू झाले तर या व्यवसायावरील मंदीचे सावट ब-यापैकी दूर होईल, असा विचार करून या क्षेत्रात मोठया व्यावसायिकांनी काही प्रयत्न सुरू केल्याचा सुगावा लागताच, सक्त वसुली संचलनालय (ईडी)ने चौकशी सुरू केली. विशेष म्हणजे बिटकॉईनचा वापराचे केंद्र गुजरातमधे अहमदाबाद येथे असल्याचे समजताच ईडीने दोन ठिकाणी धाडी घातल्याची माहितीही हाती आली आहे.
बिटकॉईन ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजावून घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाने आयटी कंपन्यांबरोबर बैठक घेतली. त्यानंतर सरकारने बिटकॉईनबाबत लवकरच एक फ्रेमवर्क तयार करण्याचा विचार सुरू केला.