>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर 1 जुलैपासूनच लागू होणार असून, यासाठीची सर्व तयारी झालं असल्याचं स्पष्ट केलं आहे. ही नवी करप्रणाली पुढील काही दिवसांसाठी टाळण्यात येणार आहेत असल्याच्या अफवा बाजारात फिरत असून त्याकडे दुर्लक्ष करण्याचं आवाहनही केंद्र सरकारने केलं आहे. जीएसटी लागू होऊ नये यासाठी काहीजण प्रयत्न करत असल्याचं गेल्या काही दिवसांत समोर आलं आहे.
पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी काही दिवसांपुर्वी जीएसटी लागू न करण्याचा प्रस्ताव दिला होता. मंगळवारी अर्थमंत्रालयाने जाहीर केलं आहे की, "1 जुलैपासून जीएसटी लागू होणार असल्याचं भारत सरकार स्पष्ट करत आहे. राज्य सरकारला सोबत घेऊन सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अॅण्ड कस्टमने प्रत्येक व्यापा-यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न वाढवला आहे".
महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, "जीएसटी लागू करण्यासाठी उशीर करत असल्याच्या अफवा असून माहिती पुर्णपणे चुकीची आहे. या अफवांना भुलू नका". अर्थमंत्रालयाने सांगितलं आहे की, 1 जुलैपासून ही ऐतिहासिक व्यवस्था सुरु करण्यासाठी जोरात तयारी सुरु आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने गेल्या तीन आठवड्यात 1200 वस्तू आणि 500 सेवांवरील टॅक्स निश्चित केला आहे. सर्व वस्तू आणि सेवांना 5, 12, 18 आणि 28 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये ठेवण्यात आलं आहे.
रविवारी जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर अरुण जेटली यांनी सांगितलं आहे की, केंद्र आणि राज्यांमध्ये सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. छोटे व्यापारी विरोध करत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना, काही लोक आपण तयार नसल्याचं सांगू शकतात. मात्र यासाठी दुसरा कोणता पर्याय नसून तयारी करावीच लागेल असं सांगितलं आहे.