मुंबई : कर्मचाऱ्यांनी कार्यपालन संस्कृतीत सुधारणा करीत नोकरशाहीचे प्रकार कमी करावेत व अधिक संवाद वाढवीत खुल्या विचारांना प्राधान्य द्यावे, तसेच काम पूर्ण करण्याची गती वाढवावी, असे आव्हान रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतेच दिले आहे. गव्हर्नर रघुराम राजन यांनी ‘आरबीआय’च्या सतरा हजार कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मेमो काढला असून त्यात वरील आव्हानाचा उल्लेख आहे. त्यात म्हटले आहे की, आपल्या बँकेचे नाव काढल्याबरोबर टीकाकारांसमोर अकल्पनीय, पारंपरिक संस्था अशी प्रतिमा न उभी राहता चैतन्यमय व बुद्धिमान संस्था असे चित्र समोर आले पाहिजे. बऱ्याचदा आपले नियम पुरेसे स्पष्ट नसतात, आपल्या कर्मचाऱ्यांनाच त्यांची बऱ्याच वेळा माहितीच नसते वा ग्राहकांना मदत करण्याची त्यांची इच्छा नसते. बरेचदा आपल्या प्रतिसादाची गती कारणाशिवाय खूप कमी व नोकरशाहीचे स्वरूप दर्शविणारी असते.देशातील चलनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे नियमन करणे, कर्जांवर नियंत्रण ठेवणे हे रिझर्व्ह बँकेचे प्रमुख काम आहे. रघुराम राजन यांनी गव्हर्नर होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही काम केले आहे. आपल्या सूचनेमध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना जिज्ञासू वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणतात की, कर्मचाऱ्यांनी केवळ बँकेपुरता विचार न करता, जगात काय चालले आहे, याचा चाकोरीबाहेर जाऊन विचार करावा. राजन यांनी पुढे म्हटले आहे की, आपल्यातील शिथिलता जाऊन आपण देदीप्यमान कार्य केले, तर संस्थेची प्रतिमा आपोआप बदलण्यास मदत होईल. आत्मसंतुष्टता व स्वसमाधान आपल्याला सामान्यत्वाकडे नेते. बँकेच्या संशोधन विभागाचा दर्जा वाढावा म्हणून बँकेच्या बाहेरील व्यक्तीचे सहकार्य घेतले पाहिजे.हा विषय भारतातील प्रत्येक सार्वजनिक संस्थेत वादाचा ठरतो. अशा संस्थांमध्ये ज्येष्ठतेनुसार बढती दिली जाते, असे त्यांनी म्हटले आहे. रघुराम राजन यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ येत्या सप्टेंबरात संपत असून, त्यांना पुढे दोन वर्षांसाठी नियुक्ती मिळते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिझर्व्ह बँकेत नोकरशाही माजवू नका
By admin | Published: January 15, 2016 2:41 AM