लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ग्राहकांकडे वारंवार केवायसी मागण्यात येऊ नये, तसेच केवायसी नसल्याच्या कारणावरून बँकिंग व्यवहार रोखण्यात येऊ नयेत, अशी शिफारस रिझर्व्ह बँकेच्या एका समितीने केली आहे. तसेच खातेधारकाच्या निधनानंतर नॉमिनींना ३० दिवसांत खात्यावरील रक्कम मिळायला हवी, अशी शिफारसही समितीने केली आहे.
समितीने म्हटले की, नोकरदार अथवा वेतनधारक तसेच विद्यार्थी हे वारंवार पैसे काढतात तसेच जमा करतात. एवढ्या एका कारणावरून त्यांची खाती बँका उच्च जोखीम श्रेणीत टाकतात. अशा खात्यांचे नियमित केवायसी अद्ययावत केले जाते.
खातेधारकांकडून ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा घेतला जाते. केवायसी अद्ययावत न केल्यास खात्यातील व्यवहारच बँका रोखतात. हा प्रकार अयोग्य असल्याचे समितीने म्हटले आहे. अशा खातेधारकांकडून वारंवार केवायसी मागितले जाऊ नये, तसेच केवायसी नाही दिले तरी बँकिंग व्यवहार रोखले जाऊ नयेत, असे समितीने म्हटले आहे.