जळगाव : यावर्षी थंडी उशिरा सुरू झाल्याने व सातत्यही कमी असल्याने सुकामेव्याला उठाव कमी आहे़ थंडी उशीरा आल्यामुळे या आठवड्यात सुकामेवा घेण्यासाठी ग्राहकांची थोडीफार गर्दी झाली होती़ मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी थंडीचे प्रमाण कमी आहे़ यामुळे यावर्षी थंडीच्या मोसमात सुकामेव्याच्या विक्रीत तब्बल ३० ते ४० टक्के घट आल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले़ तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार आता मालाचीही गुणवत्ता वाढली आहे़ मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या फास्टफूडच्या वापरामुळे नवीन पिढीचा पारंपरिक पद्धतीचे पदार्थ किंवा सुकामेवा खाण्यापेक्षा फास्टफूड खाण्याकडेच कल वाढत आहे़ त्यामुळेही सुकामेव्याच्या विक्रीवर त्याचा परिणाम होत आहे़ मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बदाम व खोबऱ्याचे भाव काहीसे वाढले असले, तरी काजू, जर्दाळू, पिस्ता, खोबरा, गोडंबी व किसमिस आदींचे दर स्थिरच आहेत़ सध्या दिवसेंदिवस फास्टफूड व रेडिमेड पदार्थांमुळे विशेष करून थंडीच्या दिवसात लाडू बनवून खाण्याकडे तरुण पिढीचा कल कमी होताना दिसत आहे़ शिवाय या पदार्थांपासून लाडू वगैरेसारखे खाद्यपदार्थ बनविण्यासाठी मेहनत व वेळही लागतो, त्यामुळे आयते पदार्थ घेण्याकडे जास्त कल दिसतो़बाराही महिने सर्वच वस्तू मिळत असल्याने, अनेक वस्तूंचे अथवा पदार्थांचे हंगामी महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे़पूर्वीप्रमाणे केवळ सणाच्या दिवशी किंवा उत्सवाच्या वेळी अनेक पदार्थ मिळत होते़ मात्र आता बदलत्या काळात रोजच ‘दसरा-दिवाळी’ साजरी होत असल्याने सणांचाही विशेष उत्साह कमी होताना दिसत आहे़महाराष्ट्रात राज्याबाहेरून व देशाबाहेरून अनेक ड्रायफ्रूटची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते़ यामध्ये प्रामुख्याने काजू केरळ, गोवा व ओडिशा इत्यादी राज्यांतून आयात केला जातो़, तर बदामाची अमेरिका व रशिया या देशांमधून आयात होते़ खारीक शेजारील राष्ट्र पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर आयात होते़ यावर्षी उशिरा आलेल्या थंडीने या आयातीवरही परिणाम होत आहे़
कमी थंडीने सुकामेव्याला बाजारात उठावच नाही
By admin | Published: January 09, 2016 12:52 AM