मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी, मुंबई
सरकारी व्याख्येनुसार निवृत्तीचे वय 58 किंवा 60 असले, तरी कोरोना महामारीनंतर आता निवृत्त होण्याचा ट्रेन्ड बदलला असून, अनेक तरुण वयाच्या 45 किंवा 50 व्या वर्षातच निवृत्ती स्वीकारून मनासारखे आयुष्य जगण्यास सुरुवात करत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा निर्णयामागे या तरुणांचा काय विचार आहे? यातून काय साध्य होते? अशा तरुणांना वृद्धत्वाकडे झुकताना आर्थिक वंचना जाणवत नाही का, या साऱ्या प्रश्नांचा हा सारांश!
केतकी, आता वय वर्ष ४७. आय.टी. इंजिनियर झाल्यानंतर, कॅम्पस मुलाखतीत तिला उत्तम नोकरी लागली आणि मग नोकरीच्या निमित्ताने जर्मनी, युरोपात काही वर्षे तिने काम केले. युरोपात सुरू असलेला प्रोजेक्ट संपवून ती भारतात आली. हेच काम किती करायचे आणि कामच करायचं तर मग आपल्या आवडी, छंद कधी जोपासायचे? अशा विचारांनी तिच्या मनाचा ताबा घेतला होता. पण, मग तिचा निश्चय झाला आणि तिने भरभक्कम पगाराची नोकरी सोडून दिली. तिच्या या निर्णयानंतर जवळच्या नातेवाईकांपासून ते मित्रांपर्यंत अनेकांनी तिला वेड्यात काढले आणि पण ती निश्चयावर ठाम होती आणि आता ती गावात छान शेती करत आहे.
नैनीशची स्टोरी पण अशीच आहे. गेल्या २२ वर्षांपासून वित्तीय क्षेत्रात कार्यरत नैनीशने मनासारखं जगण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि लेखन करण्यास सुरुवात केली. चरितार्थ चालविण्यासाठी घरबसल्या दिवसातला काही वेळ तो शेअर बाजारात ट्रेडिंग करतो. बाकी निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी लागणारा पैसा काही प्रमाणात त्याने साठवलेला आहे.
काय विचार आहे या निर्णयामागे?
अलीकडच्या काळात नोकरी लागण्याचे किंवा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचे सरासरी वय हे २२ झाले आहे. पहिल्याच नोकरीत अनेकांना पाच आकडी पगार मिळतो. घर घेणे, पैसा जास्त साठवणे याला प्राधान्य दिले जाते. ठरावीक वयापर्यंत काम करून पुढे आपल्या मनासारखे आयुष्य अथवा छंद जपणे, यासाठी वर्तमानात जास्त काम करून आर्थिक तरतूद करण्याचा विचार यामागे आहे.
आर्थिक गणित कसे करायचे?
कोरोनाकाळात दिसून आलेल्या हतबल परिस्थितीनंतरही अनेक जण या निर्णयाकडे वळताना दिसत आहेत. आर्थिक नियोजनकार दीपक जैन यांच्या मते याकरिता तीन पर्याय आहेत. जर आपल्याला लवकर नोकरी लागली अथवा व्यवसाय असेल तर, पहिल्या उत्पन्नापासून दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक केली पाहिजे. निवृत्तीवेळी जे संचित साठले आहे, त्यात गरजा बसवून त्यानुसार खर्च करावा. निवृत्तीनंतर देखील आवडीचे जे काम मिळेल त्यातून चरितार्थ चालविण्यापुरते पैसे मिळवावेत.