भारतात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडमधील मालमत्ता व्यवस्थापन पन्नास लाख कोटी रुपयांच्यावर गेले आहे. जसे गुंतवणूकदार वाढत आहेत तसे म्युच्युअल फंडमधील समज-गैरसमजदेखील वाढत आहेत. याचे कारण सर्वांनाच म्युच्युअल फंडबाबत नेमका अभ्यास नसतो. त्यामुळे जी चर्चा नेमकी नकारात्मक पसरली जाते, ती ऐकून स्वतःचे गैरसमज करून घेण्याचे प्रमाणही मोठे असते. म्युच्युअल फंडबाबत काही तथ्य जाणून घेऊयात.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेली रक्कम बुडते का?
रक्कम बुडत नाही. इक्विटी प्रकारच्या म्युच्युअल फंडमधील रक्कम थेट शेअर बाजारात गुंतवली जात असल्याने बाजार खाली-वर होतो तशी त्याची एनएव्ही कमी जास्त होत राहते. यामुळे मालमत्ता मूल्यांकन त्यानुसार वर-खाली होत असते. दीर्घ कालावधीत गुंतवलेली रक्कम वाढलीच असल्याचा अनुभव आहे.
फंड बंद करून रक्कम केव्हाही काढता येते का?
होय. आपणास आवश्यक असल्यास म्युच्युअल फंड खातं बंद करून गुंतवणूकदार रक्कम काढून घेऊ शकतात. रक्कम काढतेवेळी परतावा हा त्या दिवशीच्या एनएव्हीप्रमाणे दिला जातो. एक वर्षाच्या आत रक्कम काढली तर एक्झिट लोड वजा करून रक्कम मिळते. हा शक्यतो एक टक्का असतो.
लॉक इन कालावधी असतो का?
प्रत्येक म्युच्युअल फंडसाठी लॉक इन कालावधी नसतो. फक्त टॅक्स सेव्हिंग योजनेअंतर्गत असणाऱ्या म्युच्युअल फंडसाठी कमीत कमी तीन वर्षे लॉक इन कालावधी असतो. याचाच अर्थ तीन वर्षे रक्कम काढू शकत नाही.
म्युच्युअल फंडसाठी चार्जेस किती घेतात?
प्रत्येक म्युच्युअल फंड संस्था त्यांचे चार्जेस ठरविते. परंतु, याचे प्रमाण सेबीने ठरवून दिलेले असते. साधारण हे चार्जेस ०.०५ टक्के इतके असते.
फंडमधून रक्कम काढल्यावर टॅक्स लागतो का?
होय. टॅक्स सेव्हिंग योजनेतील म्युच्युअल फंड वगळता इतर सर्व प्रकारातील म्युच्युअल फंडमधील रक्कम काढल्यावर कॅपिटल गेन टॅक्स लागू पडतो. केंद्र सरकारच्या धोरणानुसार हा कर आकाराला जातो. अल्पकाळ टॅक्स आणि दीर्घकाळ कॅपिटल गेन टॅक्स १० टक्के ते १२.५० टक्के यानुसार आकारला जातो.
म्युच्युअल फंड व एसआयपी यात फरक काय?
यात काहीच फरक नाही. एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्युच्युअल फंडमध्ये ठरावीक अंतराने म्हणजेच महिना, आठवडा किंवा अगदी प्रत्येक दिवशी गुंतवणूक करणे आणि त्याचे योग्य नियोजन करणे म्हणजेच एसआयपी.
म्युच्युअल फंडमध्ये आपण गुंतवलेली रक्कम पुढे नेमकी कशी गुंतवली जाते?
आपण कोणत्या प्रकारातील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता यावर हे अवलंबून असते. उदा. इक्विटी प्रकारातील गुंतवणूक तुम्ही निवडलेल्या लार्ज, मिड अथवा स्मॉल कॅपमधील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतविली जाते. गोल्ड योजनेत गुंतविलेली रक्कम सोन्यात, तर डेट प्रकारातील म्युच्युअल फंडमधील रक्कम शासकीय बॉण्डमध्ये गुंतविली जाते.
म्युच्युअल फंड कोण ऑपरेट करतो?
प्रत्येक म्युच्युअल फंडसाठी अनुभवी आणि सक्षम व्यवस्थापक नियुक्त असतो. त्याचा अनुभव आणि कुशलता तो कामी लावून म्युच्युअल फंडची एनएव्ही कशी वाढेल याकडे लक्ष देत असतो.
म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक बाजार जोखीम असली तरी बाजार वाढतच असल्याचे आपण अनुभवले आहे. यामुळे जितका कालावधी अधिक, तितकी गुंतवणूक मालमत्ता अधिक हे सोपे सूत्र म्युच्युअल फंडचे आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)