१ जुलै रोजी एचडीएफसी (HDFC) लिमिटेडच्या विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँक व्हॅल्युएशननुसार जगातील चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे. या विलीनीकरणाच्या एक दिवस आधी, एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी जवळपास ४ दशकांपासून समूहाचे नेतृत्व केलं. राजीनामा दिल्यापासून ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा पहिला पगार. वास्तविक, त्यांना १९७८ मध्ये मिळालेलं ऑफर लेटर (Deepak Parekh Offer Letter) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होताना निश्चित केलेला पहिला पगार दिसून येत आहे.
दीपक पारेख यांना एचडीएफसी बँकेत जॉईन होताना हे ऑफर लेटर देण्यात आले होते असा दावा सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ऑफर लेटर बाबत केला जात आहे. हे लेटर एका यूजरनं ट्विटरवर शेअर केलंय. दरम्यान, आम्ही याची पुष्टी करत नाही.
परंतु लेटरनुसार दीपक पारेख यांनी बँकेत डिप्टी जनरल मॅनेजर म्हणून पहिले पदभार स्वीकारला होता आणि त्यांना १९ जुलै १९७८ रोजी ऑफर लेटर देण्यात आले होते. हे ऑफर लेटर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांनीही त्यावर कमेंट केलं आहे. सुमारे ४५ वर्षे जुन्या या ऑफर लेटरमध्ये त्यांच्या पगार, डीएशी संबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे.
किती होता पगार?
एचडीएफसी बँकेत जॉइन करताना दीपक पारेख यांचा मूळ पगार किती होता पाहू, ऑफर लेटरनुसार त्यांना ३,५०० रुपयांच्या मूळ वेतनावर कंपनीत रुजू होण्याची ऑफर देण्यात आली. याशिवाय ५०० रुपये महागाई भत्ता म्हणून जोडण्यात आले होते. जर तुम्ही इतर माहितीवर नजर टाकली तर त्यात १५ टक्के एचआरए आणि १० टक्के सीसीएचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटी, वैद्यकीय लाभ आणि लिव्ह ट्रॅव्हल सुविधेसह टेलिफोन बिलाच्या रिअंबर्समेंटची ऑफर देण्यात आली होती.