जर तुमच्या कुटुंबात ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांच्या खर्चासाठी तुमच्याकडे नियमित उत्पन्नाचे कोणतेही साधन नसेल, तर तुम्ही त्यांच्यासाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या ओल्ड एज पेन्शन योजनेचा (Old Age Pension) लाभ घेऊ शकता. ओल्ड एज पेन्शन योजनेत केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून योगदान देतात. त्यानुसार देशातील प्रत्येक राज्यात ओल्ड एज पेन्शन योजनेद्वारे मिळणारी रक्कम निरनिराळी आहे.
दिल्ली, हरयाणा आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्यांमध्ये, जिथे ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १००० रुपयांहून अधिक ओल्ड एज पेन्शन मिळते, हिमाचल प्रदेशमध्ये ते ५५० रुपये, राजस्थानमध्ये ५००, महाराष्ट्रात ६००, बिहारमध्ये ४०० आणि उत्तर प्रदेशात ३०० रुपये पेन्शन म्हणून दिले जातात. देशातील ज्येष्ठ नागरिकांना जगण्यासाठी दरमहा ठराविक रक्कम देण्यासाठी केंद्र सरकारनं ओल्ड एज पेन्शन योजना सुरू केली आहे.
काय आहे ही योजना?सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत सरकार ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन देते. नॅशनल ओल्ड एज पेन्शन योजना (NOAPS) १९९५ मध्ये सुरू करण्यात आली. ओल्ड एज पेन्शन स्कीमची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही संयुक्तपणे करतात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणाऱ्या रकमेचा काही हिस्सा केंद्राचा तर काही राज्याचा आहे.
किती लोकांना मिळतंय पेन्शन?सरकारी आकडेवारीनुसार, सध्या देशातील ३.५ कोटी लोकांना ओल्ड एज पेन्शन योजनेचा लाभ मिळत आहे. सध्या केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेत ३.१९ कोटी ज्येष्ठ नागरिकांना तर राज्य सरकारच्या योजनेत २८.७४ लाख निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळत आहे.
कोण घेऊ शकतं लाभ?या योजनेचा लाभ फक्त त्या ज्येष्ठ नागरिकांना दिला जातो, ज्यांचं वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे.या योजनेचा अर्जदार बीपीएल कुटुंबातील असणं आवश्यक आहे.जर अर्जदाराच्या कुटुंबातील मुलगा/नातू २० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असेल, परंतु तो बीपीएलमध्ये येत असेल, तर अर्जदारालाही त्या योजनेचा लाभ मिळेल.६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, जरी ते बीपीएल कुटुंबातील नसले तरी, त्यांना राज्य सरकारकडून पेन्शनची पूर्ण रक्कम मिळू शकते.
कुठे अर्ज करावा?६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे बीपीएल कुटुंबातील वृद्ध व्यक्ती देखील राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातील ब्लॉक स्तरावरील आरटीपीएस कार्यालयात अर्ज करू शकतात. या कार्यालयात विविध उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काउंटरवर नावनोंदणी केल्यानंतर लाभार्थीला योजनेचा लाभ दिला जातो.