Join us

सावधान! तुमचं एकाच बँकेत अकाऊंट आहे का?; 'ही' चूक पडू शकते महागात, कसं ते जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 2:51 PM

बँकांच्या बहुतांश सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यामुळेच ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगकडे कल वाढत आहे.

नवी दिल्ली - सध्या बँक आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पैशांची गरज असल्यास आपण त्वरीत बँकेत धाव घेतो. पण आता ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगमुळे बँकिंग सुविधांचा लाभ घेणे खूप सोपे झाले आहे. आता बँकांच्या बहुतांश सुविधा ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यामुळेच ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगकडे कल वाढत आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात तुम्ही तुमचे बँक खाते, बचत खाते नीट वापरत आहात की नाही याचा कधी विचार केला आहे का? कारण, बचत खाते वापरताना काही चुका होतात, ज्या दिसायला छोट्या वाटत असल्या तरी त्यांचा आर्थिक फटका खूप जास्त असतो. बचत खाते वापरताना बहुतेक लोक सहसा कोणत्या चुका करतात त्याबद्दल जाणून घेऊया...

बहुतेक लोक त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकच बचत खाते वापरतात. EMI भरण्यासाठी, विमा प्रीमियम जमा करण्यासाठी, वीज बिल भरण्यासाठी आणि ऑनलाइन खरेदी करण्यासाठी फक्त एक बचत खाते वापरतात. या सर्व गोष्टी एकाच खात्यातून केल्याने पैशांच्या खर्चावर लक्ष ठेवणे कठीण जाते. कुठे किती खर्च होतो आहे हे नेमकं कळत नाही. त्यामुळे, एकाच बचत खात्याऐवजी, तुमच्या सर्व गरजांसाठी किमान दोन खाती असली पाहिजेत.

सहसा असे दिसून येते की बरेच लोक एकाच बचत खात्यात बरेच पैसे ठेवतात. आज सायबर गुन्हे खूप वाढले आहेत आणि लोक दिवसेंदिवस बँकिंग फसवणुकीला बळी पडत आहेत. त्यामुळे सर्व पैसे एकाच खात्यात ठेवणे शहाणपणाचे नाही. त्यामुळे एका बचत खात्याऐवजी दोन किंवा अधिक बचत खाती ठेवल्यास तुमचे पैसे अधिक सुरक्षित राहतील.

तुमचे एकच बचत खाते असेल तर तुमचे त्यावरचे अवलंबित्व वाढेल. अशा परिस्थितीत, जर त्या बँकेकडून कोणतीही सुविधा दिली जात नसेल किंवा त्या बँकेच्या सेवा कोणत्याही वेळी उपलब्ध नसतील, तर तुम्हाला तुमच्या बँकिंग गरजा पूर्ण करणे कठीण होईल. त्यामुळे तुमची बचत खाती वेगवेगळ्या बँकांमध्ये असतील तर तुम्हाला अनेक सुविधा मिळतील आणि दुसरे म्हणजे संपामुळे एखादी बँक बंद असेल दुसरी बँक सुरू असेल तर तुमचं काम अडणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :बँकपैसा