नवी दिल्ली : बँकांच्या मुदत ठेवींचे (एफडी) व्याज दर सध्या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच ८ टक्क्यांच्या वर गेले आहेत. आता त्यांचा उतरणीचा कल सुरू झाला आहे. डीसीबी बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, पीएनबी आणि इंडसइंड बँक यांसह अनेक बँकांनी व्याज दर कपात सुरू केली आहे. या परिस्थितीत कॉर्पोरेट एफडी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय ठरू शकतो. कॉर्पाेरेट एफडीवर सध्या ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदर मिळतो. मात्र, यात जोखीम जास्त आहे. बँकांमध्ये केलेल्या एफडीवर ५ लाख रुपयांवर विमा हमी असते. कॉर्पोरेट एफडीवर अशी कोणतीही हमी नसते. सर्वांत मोठी जोखीम क्रेडिट रिस्कची असते.
०.७५ ते १.५% अधिक व्याजकॉर्पोरेट एफडीला गुंतवणुकीचे असुरक्षित साधन मानले जाते. बँका व एनबीएफसीवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असते, कॉर्पोरेट एफडीला मात्र हे नियम लागू होत नाही. त्यास कंपनी कायदा लागू होतो. कॉर्पोरेट एफडीमध्ये बँकांपेक्षा ०.७५ टक्के ते १.५ टक्के अधिक व्याज मिळते.
पैसे काढणे कटकटीचेयातून पैसे काढण्याचे नियम बँकांपेक्षा अधिक कडक आहेत. मुदतीपूर्वी पैसे काढल्यास अधिक दंड लागतो. अनेकदा कंपन्या मुदतीपूर्वी पैसे देण्यात अपयशीही ठरतात.
रेटिंग तपासून घ्या कॉर्पोरेट एफडीची जोखीम जाणून घेण्यासाठी त्यांचे रेटिंग पाहायला हवे. क्रिसिल, केअर आणि इक्रा यांसारख्या संस्था या एफडीला रेटिंग देतात. एएए किंवा एए प्लस रेटिंग असणाऱ्या कॉर्पोरेट फंडातच गुंतवणूक करावी. काही बाबतीत एएए रेटिंगही सुरक्षेची हमी देत नाही. त्यामुळे यात गुंतवणूक करण्यापूर्वी चांगल्या प्रकारे पडताळणी करणे गरजेेचे आहे.