Zomato Deepindar Goyal : अॅपच्या माध्यमातून फूड डिलिव्हरी करणारा प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato) आता मोठा ब्रँड बनला असला तरी तो सुरू करताना कंपनीचे संस्थापक दीपिंदर गोयल यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. दीपिंदर गोयल यांनी एका किस्सा सर्वांसोबत शेअर करून आपल्या जुन्या दिवसांची आठवण काढली. "मी १६ वर्षांपूर्वी २००८ मध्ये झोमॅटो ची सुरुवात केली, तेव्हा, तुझे वडील कोण आहेत हे तुला माहित आहे का? असा प्रश्न माझ्या वडिलांनी विचारला होता," असं दीपिंदर गोयल म्हणाले.
काय म्हणाले दीपिंदर गोयल?
"तू स्टार्टअप करू शकत नाहीस, असं त्यांचं म्हणणं होतं. मी पंजाबच्या एका लहान शहरातून आलोय. ही माझी पार्श्वभूमी असली तरी गेल्या १६ वर्षांमध्ये खूप काही बदललंय. विशेष करून गेल्या ७-८ वर्षांमध्ये, सरकारनं मार्ग मोकळा केला आहे आणि आता कोणत्याही अडचणी नाहीत. हे पुढेही कायम राहिल अशी मला अपेक्षा आहे," असं दीपिंदर गोयल म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केला व्हिडीओ
दीपिंदर गोयल यांचा हा व्हिडीओ केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या माध्यमातून पुरी यांनी मोदी सरकारच्या धोरणांचा परिणाम दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी या व्हिडीओसोबच दीपिंदर गोयल यांचं वक्तव्यही लिहिलंय. "जेव्हा मी २००८ मध्ये झोमॅटो सुरू केलं तेव्हा तुझे वडील कोण आहेत, हे तुला माहितीये का असा प्रश्न वडिलांनी केला होता. कारण माझ्या वडिलांना वाटत होतं की आमची विनम्र पार्श्वभूमी पाहता मी कधीच स्टार्टअप करू शकत नाही. या सरकारनं आणि त्यांच्या पुढाकारानं माझ्यासारख्या छोट्या शहरातील मुलाला झोमॅटोसारखं काहीतरी तयार करता आले, जे आज लाखो लोकांना रोजगार देत आहे," असं झोमॅटोचे दीपिंदर गोयल म्हणत असल्याचं त्यांनी लिहिलंय.