Join us  

मद्याची स्टँडर्ड बॉटल 750 ML चीच का असते, माहितीये यामागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 8:46 PM

१८ व्या शतकापासून याची सुरूवात झाली असून पाहा काय आहे यामागे कारण...

Why Most of the Alcohol Bottles are 750 ml: भारतात बहुतेक मद्याच्या मोठ्या बाटल्या या 750 एमएलच्या दिसतात. यापेक्षाही लहान मोठ्या बाटल्या असल्या तरी 750 एमलच्याच या बाटल्या का? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच कधी ना कधी पडला असेल. यामागेही एक कारण आहे. जाणून घेऊया याबद्दल.

कॉकटेल इंडिया यूट्यूब चॅनलचे संस्थापक संजय घोष यांच्या मते एक सिद्धांत असा आहे की सुरुवातीला मद्य बॅरलमध्ये ठेवले जात होते. 18 वं शतक येईपर्यंत मद्य साठवण्यासाठी काचेच्या बाटलीपेक्षा काहीही चांगले नाही यावर सहमती झाली. त्या काळात बाटल्या बनवण्यासाठी 'ग्लास ब्लोइंग' तंत्राचा वापर केला जात होता. या तंत्रात, पोकळ धातूच्या पाईपचे एक टोक 2000 डिग्रीपेक्षा अधिक तापमान असलेल्या उकळत्या ग्लासमध्ये घातले जात होते. नंतर गरम काच पाईपभोवती गुंडाळल्यावर त्याला स्टीलच्या प्लेटवर फिरवून आकार दिला जायचा. नंतर पोकळ पाईपमधून हवा काचेत भरली जाते आणि बाटलीचा आकार वाढतच राहायचा. एका विशिष्ट वेळी, बाटली 650 ते कमाल 750 ml पर्यंत फुगायची. नंतर 750 मिली स्टँडर्ड साईज म्हणून स्वीकारले गेले. अजूनही काही कंपन्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने बाटल्या तयार करतात. ग्लास ब्लोइंग टेक्निक म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पाहता येईल.आधुनिक काळाबद्दल बोलायचे झाल्यास, घोष यांच्या मते, 1975 मध्ये युरोपमधील मद्य उत्पादकांना विशिष्ट कंटेनरमध्ये विशिष्ट प्रमाणात अल्कोहोल पॅक करण्याचे कायदेशीर बंधन घालण्यात आले होते. असे म्हटले जाते की मद्य विक्रेता आणि खरेदीदार दोघांनी 750 मिली हे प्रमाण म्हणून स्वीकारण्यास सहमती दर्शविली.

त्याच वेळी, मद्याची बाटली 750 मिली ठेवण्याचे एक कारण सोपे गणितही असू शकते. गॅलनचा हिशोब ठेवण्यासाठी 750 एमएल हे एक स्टँडर्ड मानले जाते. त्याच वेळी, कालांतराने 180 एमएल आणि 375 एमएल यांनाही मान्यता मिळाली. वास्तविक, 375 ml, 180 ml, 90 ml ते 50 ml पर्यंतच्या आकाराचे असे प्रकार फक्त आपल्या देशातच आढळतील. लोकांच्या खिशाचा विचार करून या छोट्या बाटल्या तयार केल्या होत्या. त्याच वेळी, जर एखाद्याला नवीन ब्रँडची चव आणि फ्लेवर याबद्दल खात्री नसेल तर तो तो कमी प्रमाणात खरेदी करू शकतो आणि ती पाहू शकतो.

मिनिएचरची गरज का पडली?

मद्याच्या मिनिएचर बाटल्या खूप प्रसिद्ध आहेत. आजकाल, आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासादरम्यान अशाच बाटल्या दिल्या जातात. पंचतारांकित हॉटेल्सच्या खोल्यांच्या मिनी बारमध्येही यांचा समावेश असतो. आजकाल महागड्या मद्याच्या बाटल्याही भेट दिल्या जातात. पण लहान बाटल्यांच्या मागचा इतिहास काय आहे? घोष यांच्या म्हणण्यानुसार, जॉन पॉवर अँड सन्स आयरिश व्हिस्की कंपनीने 1889 मध्ये प्रथम लहान बाटल्या लाँच केल्या होत्या. मद्याच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या आयरिश कुटुंबानं त्यांच्या टांगेवाल्याला एकदा फ्लास्कमधून छोटे घेताना पाहिले होते. तेव्हाच त्या कुटुंबीयाच्या मनात असा विचार आला. दुसरे कारण म्हणजे आयरिश व्हिस्की साधारणपणे महाग असायची. अशा परिस्थितीत त्याची चव घेण्यासाठी त्यांना संपूर्ण बाटली उघडावी लागत होती.मिनिएचर प्रसिद्ध होण्यामागे आणखी एकही गोष्ट आहे. 1920 आणि 1930 च्या दशकात अमेरिकेत मद्यावर बंदी घालण्यात आली होती. अशा परिस्थितीत युरोपातून मद्याच्या छोट्या बाटल्या तस्करीच्या माध्यमातून अमेरिकेत पोहोचत असत. त्या लहान असल्याने त्या ठेवणेही सोयीचे होते. त्यानंतर या प्रसिद्ध झाल्या आणि बंदी उठवल्यानंतर कंपन्यांनीही मिनिएचर बाटल्या तयार करण्यास सुरूवात केली.

टॅग्स :व्यवसाय