कोलकाता : तुम्ही तुमचा जुना स्मार्ट फोन विकत असाल अथवा एक्स्चेंज आॅफरमध्ये देत असाल, तर सावध व्हा. तुमच्या फोनमधील तुमचा डेटा तुम्ही काढून टाकला असे तुम्हाला वाटत असले तरी तो पुन्हा मिळवून वा चोरून त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. साधारणत: ‘फॅक्टरी रिसेट’च्या माध्यमातून स्मार्ट फोनमधील डेटा लोक उडवितात. तथापि, या पद्धतीने उडविलेला डेटा सहजपणे पुन्हा मिळविता येऊ शकतो, असा फोन जर तुम्ही कोणाला विकला असेल, अथवा एक्स्चेंज आॅफरमध्ये दिला असेल, तर तुमचा हा डेटा इतरांच्या हाती लागू शकतो.
स्मार्टफोनमधील डेटा विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच पूर्णत: काढून टाकला जाणे आवश्यक आहे. ‘स्टेलर’चे सहसंस्थापकीय संचालक मनोज धिंग्रा यांनी सांगितले, हल्ली अत्यंत महत्त्वाचा खाजगी डेटा स्मार्टफोनमध्ये असतो. फोन बँकिंगची सोय झाल्यामुळे बँकविषयक डेटाही त्यात असतो. कित्येकांनी तर आधार व पॅनची माहितीही त्यात ठेवलेली असते. तसेच विविध अॅपचा वापर करण्यात येत असतो, तेव्हाही आपला डेटा स्मार्टफोनमध्ये जमा होत असतो. ‘डेटा इरेझर सोल्युशन्स’च्या माध्यमातूनच हा डेटा नष्ट केला गेला पाहिजे. अन्यथा हा डेटा इतरांच्या हाती लागू शकतो. त्यांच्या कंपनीने ‘बिटरेझर’ नावाचे सॉफ्टवेअर खास डेटा उडविण्यासाठी तयार केले आहे. हे सॉफ्टवेअर अॅण्ड्रॉईड आणि आयफोन अशा दोन्ही प्रकारच्या स्मार्ट फोनसाठी वापरता येऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.
नवे सॉफ्टवेअर
स्टेलरचे उपाध्यक्ष सुधांशू पुरी यांनी सांगितले, सध्या स्मार्ट फोनमधील आधीचा डेटा संपूर्णत: काढून टाकायचा असेल, तर त्यासाठी ग्राहकांना मोबाइल फोन सेंटरवर जावे लागते. आम्ही मोबाइल स्टोअर आणि सर्व्हिस सेंटर्ससाठी बहुपयोगी सॉफ्टवेअर आणत आहोत.