Join us

स्वस्तातला शेअर चांगला असे वाटते का तुम्हाला? आजचे पेनी स्टॉक पूर्वी मस्त चालायचे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 10:13 AM

काहींना वाटते पेनी स्टॉक म्हणून तो शेअर चांगला असेल. परंतु, स्वस्त म्हणजे मस्त असे अजिबात गृहीत धरू नये.

लोकमत न्यूज नेटवर्क :शेअर बाजारात शेअरचा भाव बघून व्यवहार करणारे अनेक गुंतवणूकदार असतात. काहींना वाटते भाव स्वस्त (पेनी स्टॉक) म्हणून तो शेअर चांगला असेल. परंतु, स्वस्त म्हणजे मस्त असे अजिबात गृहीत धरू नये.

पेनी स्टॉक म्हणजे काय? 

जे शेअर अत्यंत स्वस्त म्हणजे पैशांत किंवा काही रुपयांत उपलब्ध असतात, त्यास पेनी स्टॉक असे म्हणतात. याचे उदाहरण म्हणजे वोडा-आयडिया, सुझलॉन, आर कॉम, आर नवल, युनिटेक, आदी. आज या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव पाहता ते पेनी स्टॉक कॅटेगरीमध्ये मोडतात.

शेअरचा भाव नक्की कसा ठरतो? 

शेअरचा भाव हा स्टॉक एक्स्चेंजमध्ये त्याच्या मागणी आणि विक्रीवर ठरतो. मागणी जसजशी वाढत जाते, तसतसा भावही वाढत जातो.

मागणी कोणत्या कारणांनी वाढते? 

कंपनीची उलाढाल, नफा, प्रॉफिट मार्जिन यात जसजशी वाढ होत जाते, तशी अशा कंपन्यांच्या शेअर्सला मागणी वाढत जाते. कंपनी फंडामेंटल हे टूल याच्या अभ्यासात गुंतवणूकदारांना मदत करीत असते. यात नफा, उलाढाल, प्रॉफिट मार्जिन यासोबतच तिमाही कालावधीत विदेशी गुंतवणूकरांनी, म्युच्युअल फंडांनी, घरेलू मोठे गुंतवणूकदार यांनी त्या शेअरमध्ये खरेदी वाढविली आहे का विक्री जास्त  केली आहे हे समजते. यात खरेदी अधिक असेल तर कंपनीचे एकूण कार्य उत्तम चालले आहे असे समजण्यास हरकत नसावी. किरकोळ गुंतवणूकदारांच्या खरेदी आणि विक्रीवर शेअरचा भाव ठरण्यात  तितकासा प्रभाव पडत नसतो.

आता सांगा स्वस्त म्हणजे मस्त का?

या सर्व कंपन्यांचे फंडामेंटल कमकुवत होत गेले. अनेक कारणांनी या कंपन्यांची उलाढाल कमी होत गेली, नफा कमी कमी होत गेला, नफ्याचे मार्जिनही  कमी कमी होत गेल्याने गुंतवणूकदार या कंपन्यांचे शेअर्स हळूहळू विकू लागले. परिणामी भाव खाली खाली येत गेला. म्हणूनच स्वस्त म्हणजे चांगले असे सिद्ध होत नाही.

या लेखात उल्लेख केलेल्या पेनी स्टॉकचे चार्ट पॅटर्न पहा.  दहा-पंधरा  वर्षांपूर्वी या सर्व शेअर्सच्या किमती पहा. या कंपन्या तेव्हा चांगल्या स्थितीत होत्या आणि त्यांच्या शेअर्सचे भाव त्याकाळी सर्वोत्तम पातळीवर होते.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी कंपनी फंडामेंटलवर अवश्य लक्ष ठेवावे. अशा शेअर्समध्येच गुंतवणूक कायम ठेवावी किंवा नव्याने गुंतवणुकीचा विचार करावा, ज्या कंपन्या उत्तम चालल्या आहेत व ज्यांच्या व्यवसायास वर्तमान व भविष्यकाळात उत्तम दिवस आहेत. शेअरचा भाव पाहून गुंतवणूक करू नका. कंपनीचा व्यवसाय पहा. उत्तम व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येच गुंतवणूक करा. मग भाव जास्त असला तरी काय हरकत आहे?

कंपनी              शेअर भाव      नाव    २००७-०८    सध्याआयडिया    ₹११०    ₹८.७०सुझलॉन    ₹३७०    ₹६.३५युनिटेक    ₹३८०    ₹१.६५आर कॉम    ₹७५०    ₹२.१५

टॅग्स :शेअर बाजार