Join us

तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 5:09 AM

बिहेविअरल फायनान्स हा शब्द सध्या फार चर्चेत असतो.  वर्तनाचा थेट आर्थिक स्थितीशी संबंध आहे, असं व्यवहारज्ञान हा नवा शब्द मांडतो.

- पी. व्ही. सुब्रमण्यम, आर्थिक सल्लागार

बिहेविअरल फायनान्स हा शब्द सध्या फार चर्चेत असतो.  वर्तनाचा थेट आर्थिक स्थितीशी संबंध आहे, असं व्यवहारज्ञान हा नवा शब्द मांडतो.आत्ता तुमच्याहाती किती पैसा आहे, याच्याशी श्रीमंत होण्याचा आणि संपत्ती निर्माणाचा  काहीही संबंध नसतो. तुमची मनस्थिती काय आहे, दृष्टिकोन काय आहे, यावर तुमची आर्थिक स्थिती उन्नत होणार की घसरणार हे ठरतं.त्यामुळे एक साधा प्रश्न स्वत:ला विचारा, ‘मला श्रीमंत व्हायचं आहे का?’ बहुतेक लोक या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणतात, कसं शक्य आहे? कुठून येणार एवढा पैसा श्रीमंत व्हायला?-  त्यांचं श्रीमंत होणं तिथंच संपतं! मात्र जो ठामपणे म्हणतो, मला श्रीमंत व्हायचं आहे त्यासाठी काय करावं लागेल सांगा? - त्याला श्रीमंत होता येतं..उदाहरण सांगतो. बत्तीस वर्षांच्या आगेमागे असलेलं एक जोडपं. त्याची सीटीसी २५ लाख. तिची १५ लाखाच्या घरात. भारतीय स्टँडर्डने विचार केला, तर ते भरपूर पैसे कमावतात. पण ‘त्याला’ भेटा. तो सतत म्हणतो, माझ्याकडे पैसे नाहीत. पैसेच पुरत नाहीत. घर घ्यायचं मुंबईत, तर डाऊन पेमेण्ट करायला १५ लाख कॅश हातात नाही.- मग एवढे पैसे कमावूनही  गेला कुठं पैसा? तर तो २५ लाखांच्या गाडीत फिरतो. क्रेडिट कार्डवर ४२ टक्के व्याज भरतो. बचत जेमतेम करतो. सगळा पैसा लाइफस्टाईलवर खर्च होतो. त्याउलट एक १० लाख सीटीसीवाला. त्यानं घर घेतलं, घराचे हप्ते भरतो. कमी किमतीची-परवडेल  अशी गाडी चालवतो, रिटायरमेण्टचा विचार करतो, बाहेर साधी पाण्याची बाटली विकत घेताना डिटेलिंग करतो की यापायी किती पैसे गेले, त्यापेक्षा घरुन पाण्याची बाटली आणली तर? - आता यातून कुणी श्रीमंत होतो का? तर त्याचं उत्तर आहे ‘डिटेलिंग’मध्ये. आपण कमवत असलेला एकेक पैसा जर वाढीस लावला, त्याचं नियोजन केलं, अगदी एसआयपीपासून सुरुवात केली, खर्च आवाक्यात ठेवले, डोक्यावर कर्ज कशासाठी घेणार, याचा विचार केला तर आपण श्रीमंत आणि स्वतंत्र होण्याकडे पावलं टाकू लागतो. श्रीमंत होण्यासाठी, आर्थिक प्रगती करण्यासाठी पैसा-बचत-खर्च आणि गुंतवणूक यांची गरज आहे. आणि दुर्देव हे की, अनेक शिक्षित मंडळी या साऱ्या नियोजनापासून दूर राहतात. भरपूर पैसा कमावूनही मेरे पास कुछ नही, म्हणत पालकांकडे मदतीसाठी हात पसरतात. वर्तनदोष हा श्रीमंतीच्या मार्गातला अडसर ठरतो.