Fraud Customer Care Number : अनेकदा आपल्याला बँका किंवा क्रेडिट कार्ड किंवा अन्य कोणत्याही सेवेसाठी तक्रार कुठे करायची याची कल्पना नसते. आपण सर्रास गुगल सुरू करतो आणि त्यांचा कस्टमर केअर नंबर शोधतो. इतकंच काय त्यावर फोन लाऊन आपली माहितीही देतो. परंतु असं जर तुम्हीही करत असाल तर वेळीच सावध व्हा. गुगल सर्च इंजिनमध्ये तुम्हाला दिसणारे नंबर हे सायबर ठगांचेदेखील असू शकतात. अशातच तुम्ही माहिती न घेता जर तुम्ही नंबर डायल केला तर तुम्ही सायबर ठगांकडून नक्कीच ठगले जाऊ शकता.
अनेकदा लोकांना सेवेशी संबंधित समस्यांसाठी बँक किंवा कंपनीशी संपर्क साधावा लागतो. परंतु यासाठी त्यांना नंबर शोधण्याचा सोपा मार्ग सापडतो तो म्हणजे गुगल. मग सुरू होतो ऑनलाइन फसवणुकीचा खेळ. म्हणून, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या या सायबर ठगांना सामोरं जायचं नसेल तर जेव्हाही तुम्ही गुगल सर्चवर कंपनीचा हेल्पलाइन किंवा कस्टमर केअर नंबर शोधता तेव्हा तो नीट तपासा. शक्य असल्यास संबंधित कंपनीच्या किंवा बँकेच्या वेबसाईटवरूनच तो घ्या किंवा त्याच्याशी जुळवून पाहा. तुम्ही संपर्क केल्यानंतर तुमच्याकडे बँकेशी निगडीत कोणतीही माहिती मागितली तर ती देऊ नका.
कोट्यवधींची फसवणूकगेल्या वर्षी, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) वर, IFSO आणि पोलिसांनी देशभरातील ५ हजारांहून अधिक लोकांकडून कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा खुलासा केला होता. चेक संबंधित माहितीसाठी गुगलवरून बँकेचा कस्टमर केअर नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला होता असं एकानं सांगितलं. यादरम्यान त्याला एक नंबर मिळाला. नंबरवर कॉल करणाऱ्यानं बँकेचा प्रतिनिधी असल्याचं दाखवून त्याला एक लिंक पाठवली. ही लिंक बँकेच्या वेबसाईटशी मिळतीजुळती होती. फोनवरून सांगितल्याप्रमाणे त्यानं प्रक्रिया पूर्ण केली. त्यातील लिंक डाउनलोड करताच त्याचा मोबाईल हॅक झाला. यानंतर त्या व्यक्तीच्या खात्यातून २७.१० लाख रुपये काढण्यात आले. तपासात डझनहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली. सायबर ठगांनी वेगवेगळ्या बँकांसारख्या दिसणाऱ्या लिंक्स आणि वेबसाइट्स तयार केल्याची माहिती मिळाली. यामध्ये आपली लिंक सर्वात वर दिसण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचा वापरही करण्यात आला.
दिल्ली पोलिसांच्या IFSO ने अलीकडेच ५० हून अधिक बनावट शॉपिंग वेबसाइट्सद्वारे देशभरातील १० हजारांहून अधिक लोकांची २५ कोटींहून अधिक फसवणूक केल्याचा पर्दाफाश केला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सांगितलं की, त्यांच्या टोळीनं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) चा वापर करून त्यांची बनावट वेबसाइट सर्च लिस्टमध्ये टॉपवर ठेवली जेणेकरून अधिकाधिक लोक त्यांच्या जाळ्यात अडकू शकतील. जेव्हा कोणी गुगल किंवा इतर ब्राउझरवर प्रोडक्ट विकत घेण्यासाठी सर्च करायचं, तेव्हा त्यांची बनावट वेबसाईट सर्वात वर दिसायची.
काय करू शकता?साईट कोणतीही माहिती टाकण्यापूर्वी युआरएल तपासून पाहा. ॲड्रेसबारमध्ये स्पेलिंग नीट तपासा. वेबसाइट योग्य असल्यास, Contact Us, Helpline किंवा Support सारखे पर्याय त्या पेजच्या तळाशी किंवा वरच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उपलब्ध असतील. त्यावर क्लिक करून तुम्ही कंपनीचा संपर्क क्रमांक पाहू शकता. फसवणूक झाल्यास, ताबडतोब १९३० वर कॉल करा किंवा सायबर क्राईम पोर्टल cybercrime.gov.in वर तक्रार करा.