Join us

डॉलरच्या तुलनेत ऑल टाईम लो वर रुपया, शेतीपासून किचनपर्यंत होऊ शकतो परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:47 IST

Dollar Vs Rupee: सलग दुसऱ्या सत्रात घसरणीचे संकेत आहेत. सातत्यानं घसरत असलेल्या पैशाचा तुमच्या खिशावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊ.

Dollar Vs Rupee: आठवड्याच्या पहिल्या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपया २७ पैशांनी घसरून ८६.३१ च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. रुपयाचा हा नवा नीचांकी स्तर आहे. सलग दुसऱ्या सत्रात घसरणीचे संकेत आहेत. सातत्यानं घसरत असलेल्या पैशाचा तुमच्या खिशावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊ.

तज्ज्ञांच्या मते, भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आणि डाळींची आयात करतो. रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्यानं तेल आणि डाळींना आणखी महाग होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम त्यांच्या किमतींवर होऊ शकतो. ही महागाई आपल्या स्वयंपाकघराचं बजेट खराब करू शकते. अभ्यास, प्रवास, डाळी, खाद्यतेल, कच्चं तेल, कम्प्युटर, लॅपटॉप, सोनं, औषधं, रसायनं, खतं, अवजड यंत्रसामग्री अशा आयात वस्तू महागण्याची शक्यता आहे.

रुपयाची घसरण का झाली?

ही घसरण प्रामुख्यानं मजबूत अमेरिकी डॉलर आणि अस्थिर जागतिक बाजारपेठेच्या परिस्थितीमुळे झाली. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, परकीय गुंतवणुकीचा सातत्यानं कमी होणारा ओघ आणि देशांतर्गत शेअर बाजारातील नकारात्मक वातावरण यामुळेही रुपयावर दबाव वाढला. अमेरिकेत अपेक्षेपेक्षा चांगली रोजगारवाढ झाल्यानं डॉलरची ताकद वाढली. या वाढीमुळे बेंचमार्क यूएस ट्रेझरी यील्डमध्ये वाढ झाली. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीचा वेग कमी करू शकते, अशी आशा आहे.

करन्सी एक्सचेंज मार्केटमध्ये रुपया ८६.१२ वर उघडला, परंतु सुरुवातीच्या व्यवहारात तो ८६.३१ च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला. शुक्रवारी तो ८६.०४ च्या बंद भावापेक्षा २७ पैशांनी घसरला.

टॅग्स :पैसा