Join us  

Dollar vs Rupees: रूपया आपटला, डॉलरच्या तुलनेत आजवरची ऐतिहासिक घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 12:48 PM

डॉलरच्या तुलनेत रुपयाची ही आतापर्यंतची नीचांकी पातळी आहे.

सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाल्याचं दिसून आलं. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ही आतापर्यंतची नीचांकी पातळी आहे. यूएस फेडच्या प्रमुखांनी दिलेल्या संकेतामुळे रुपयामध्ये मोठी घसरण झाल्याचं म्हटलं जातंय. यूएस फेडचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी शुक्रवारी मध्यवर्ती बँकांसोबत झालेल्या बैठकीत महागाई नियंत्रित करण्यासाठी व्याजदर कमी करणं शक्य नसल्याचं सांगितलं. या संकेतांनंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य आणखी घसरलं. एका डॉलरची किंमत आता 80.11 रुपये झाली आहे. यापूर्वीच्या क्लोजिंगमध्‍ये एका डॉलरची किंमत 79.97 रुपये होती.

यापूर्वी गेल्या महिन्यात रुपयानं डॉलरच्या तुलनेत मागील सर्व विक्रम मोडीत काढले होते. तेव्हा एका डॉलरची किंमत 80.0650 रुपये होती. आजच्या घसरणीने मागील महिन्याचा विक्रमही मोडला आहे. सोमवारी कामकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकातही मोठी घसरण दिसून आली.

“बाजाराला यूएस फेड सकारात्मक राहिल अशी अपेक्षा होती. परंतु त्यांच्याकडून मिळालेले संकेत लोकांसाठी आणि व्यवसायासाठी सकारात्मक नाही. महागाई कमी करण्यासाठी इतकी कठोर पावलं अपेक्षित नव्हती,” अशी प्रतिक्रिया जिओजित फायनॅन्शियल सर्व्हिसेसचे व्ही.के.विजयकुमार म्हणाले. घसरलेल्या रूपयाचा परिणाम एपीआयद्वारे होणाऱ्या गुंतवणूकीलाही झटका देऊ शकतो. गेल्या आठवड्यांत एफपीआयद्वारे गुंतवणूक वाढली आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक