नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे देशांतर्गत विमान प्रवासाच्या तिकीटदरांवर केंद्र सरकारने मर्यादा घातली होती. आता या निर्णयाला २४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळी, नाताळसारख्या सणासुदीच्या दिवसांत विमान कंपन्यांना आपल्या तिकीटदरांमध्ये वाढ करता येणार नाही. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी हा निर्णय घेतला. तिकीटदरावर मर्यादा घालण्याची मुदत २४ नोव्हेंबरपर्यंतच होती. त्यामध्ये आणखी तीन महिन्यांची वाढ करण्यात आली.
कोरोना साथीमुळे मार्च महिन्यामध्ये देशांतर्गत विमानसेवा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून ही सेवा पुन्हा सुरू झाली. देशांतर्गत विमान प्रवासाचे त्याला लागणाऱ्या वेळेनुसार सात गट आले आहेत. ४० मिनिटांपेक्षा कमी, ४० ते ६० मिनिटे, ६० ते ९० मिनिटे, ९० ते १२० मिनिटे, १२० ते १५० मिनिटे, १५० ते १८० मिनिटे, १८० ते २१० मिनिटे असे विमान प्रवास वेळेनुसार गट पाडण्यात आले आहेत. त्याप्रमाणे विमान प्रवासाच्या तिकीटदरांवर केंद्र सरकारने मर्यादा घातली. देशांतर्गत विमान प्रवासाचे किमान तिकीटदर २ हजार रुपये ते ६५०० व कमाल दर ६ हजार ते १८ हजार रुपये असावेत, असा सरकारचा आदेश आहे.
मुंबई- दिल्ली प्रवाशांना लाभदिल्ली-मुंबईचा विमान तिकीटदर ३५०० ते १० हजार रुपये केंद्र सरकारने घातलेल्या मर्यादांमुळे दिल्ली ते मुंबई या प्रवासाचे तिकीटदर किमान ३५०० रुपये, तर कमाल तिकीटदर १० हजार रुपयापर्यंत आहे. देशात मुंबई-दिल्ली या हवाई मार्गावर प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे.