Join us

देशांतर्गत हवाई प्रवासी संख्येत झाली ४.९२ टक्क्यांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 4:26 AM

जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत देशातील ३ कोटी ५४ लाख ५३ हजार जणांनी हवाई प्रवास केला आहे.

- खलील गिरकरमुंबई : जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत देशातील ३ कोटी ५४ लाख ५३ हजार जणांनी हवाई प्रवास केला आहे. २०१८च्या जानेवारी ते मार्च महिन्यात ही संख्या ३ कोटी ३७ लाख ९० हजार होती. यामध्ये ४.९२ टक्क्यांची वाढ नोंद झाली आहे.हवाई सेवेच्या दर्जाबाबत व इतर असुविधांबाबत १ हजार ६८४ प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त तक्रारी जेट एअरवेजच्या सेवेबाबत असून, त्या खालोखाल एअर इंडियाच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. एकूण तक्रारींपैकी सर्वात जास्त म्हणजे ६० टक्के तक्रारी विमानातील समस्यांबाबत आहेत. त्या खालोखाल बॅगेजबाबत १६.३ टक्के तक्रारी, परतावा (रिफंड)बाबत ११.८ टक्के तक्रारी असून, इतर तक्रारींमध्ये ग्राहकासोबतचे दुर्वर्तन, जास्त भाडे, दिव्यांगांना पुरेशा सुविधा नसणे, खाद्यपदार्थांचा दर्जा अशा तक्रारींचा समावेश आहे. १,६८४ तक्रारींपैकी १,५७५ तक्रारींचे यशस्वीपणे निराकारण करण्यात आले असून, उर्वरित १०८ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे, या प्रलंबित तक्रारी एअर इंडियाबाबतच्या आहेत. जेट एअरवेजच्या १,०१३ तक्रारी, एअर इंडियाच्या २६६ तक्रारी, इंडिगोच्या २५५ तक्रारी, स्पाइसजेटच्या ८४ व गो एअरच्या ४४ तक्रारी व इतर कंपन्यांच्या तक्रारींचा यामध्ये समावेश आहे.

विमान रद्द, विमानाला विलंबाचा ४ लाख ७३ हजार प्रवाशांना फटका- विमानात प्रवेश नाकारल्याचा फटका ४,९७३ प्रवाशांना बसला. त्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधा व नुकसानभरपाईपोटी २ कोटी ९३ लाख ६ हजार रुपये देण्यात आले. विमान रद्द झाल्याचा फटका सर्वात जास्त २ लाख ७२ हजार ७८ प्रवाशांना बसला. त्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधा व नुकसानभरपाईपोटी ८० लाख ११ हजार रुपये खर्च करण्यात आले.- विमानाला विलंब झाल्याचा फटका १ लाख ९६ हजार ८१३ प्रवाशांना बसला. त्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधांसाठी १ कोटी ५७ लाख ३ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.

टॅग्स :विमान