मुंबई : कोरोनामुळे अनेक उद्योगांवर परिणाम झाला आहे. इतकेच नाही तर तेल बाजारालाही कोरोनाचा फटका बसला आहे. इतर देशातून आयात होणारे तेल कमी येत असून त्यामुळे खाद्यतेलाचे भाव दहा ते तीस रुपयांनी वाढले आहे. दिवाळीच्या तोंडावर तेल महागल्याने गृहिणींना तेलाची फोडणी जपून टाकावी लागणार आहे.
दिवाळी, दसरा या सणात विविध पदार्थ केले जातात. त्यामुळे तेलाची मागणी जास्त असते. खाद्यतेलामध्ये सर्वाधिक मागणी ही सूर्यफूल तेलाला असते. म्हणजे ८० टक्के मागणी सूर्यफूल तेल, तर २० टक्के इतर खाद्यतेल अशी स्थिती असते. सूर्यफूल, पाम आणि सोयाबिन तेल हे परदेशातून आयात केले जाते. पामतेल मलेशिया, सोयाबीन तेल अमेरिका, सूर्यफूल तेल रशिया, युक्रेन येथून आयात होते. पण यंदा वातावरणातील बदलामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेल १० ते ३० रुपयांनी महाग झाले आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, तेलविक्री वाढविण्यासाठी दरावर सूट दिली जाते. पण सण उत्सवात तेलाची विक्री वाढते म्हणून कंपन्या तेल दरात सूटही देत नाहीत.
तेल का महागले?
बाजारात ८० टक्के मागणी सूर्यफूल तेलाला आहे. भारताला युक्रेन आणि रशिया या देशांतून तेलाचा पुरवठा होतो. यंदा वातावरणातील बदलामुळे सूर्यफूल तेल उत्पादनावर परिणाम झाला. तेल पुरवठा कमी झाला. अमेरिका, अर्जेंटिना येथून येणाऱ्या सोयाबीन तेलाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाल्याने तेल महागले आहे.
सणासुदीच्या काळात तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आयात कमी झाली असून त्यामुळे तेल दरात वाढ झाली आहे. पामतेल १०, तर सूर्यफूल तेल १५ ते ३० रुपयांनी महाग झाले आहे.
- विवेक ठक्कर,
व्यापारी
गेल्या काही दिवसांत तेल जास्त महाग झाले आहे. तेल ही अत्यावश्यक आहे. एखादी वस्तू महाग झाली तर ती टाळता येते, पण तेल तर पाहिजेच असते. तेल दर कमी करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना कराव्यात.
- दीपाली वाघमारे,
गृहिणी