अविनाश कोळीलोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाकाळात आरोग्याबाबत वाढलेली सतर्कता चहाच्या नव्या संस्कृतीला जन्म देत आहे. पारंपरिक चहापेक्षा ‘ग्रीन टी’च्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. काही चहा उत्पादकांना मागणीत चौपट वाढ झाल्याचाही अनुभव येत आहे. येत्या काही महिन्यात यात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ग्रीन टीचे देशांतर्गत वार्षिक उत्पादन २ ते २.५ लाख टन इतके आहे. देशातील एकूण सर्वप्रकारच्या चहाचे उत्पादन १३०० दशलक्ष किलोच्या घरात आहे. एकूण चहा उत्पादनात ग्रीन टीचे उत्पादन १.५ ते २ टक्के इतके आहे. देशांतर्गत मागणी कोरोनापूर्वी कमी होती. ती आता काही ठिकाणी दुप्पट तर काही ठिकाणी चौपट झाली. इम्युनिटी बुस्टर (रोगप्रतिकारक पेय) म्हणून ग्रीन टीचा वापर वाढला आहे. मार्च ते नोव्हेंबर या काळात चहाची नवी ग्रीन संस्कृती वाढत असल्याने मागणीतही तितकीच वाढ झाली आहे. मागणीचा विचार करुन दक्षिण व उत्तर भारतात याच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
जगातील एकूण ग्रीन टी उत्पादनात सर्वाधिक उत्पादन म्हणजेच ५० ते ८० टक्के उत्पादन चीनमध्ये होते. भारतात चहा संस्कृती बदलत असल्याने पीक पद्धतीतही बदल होण्याची शक्यता आहे.
दरात होतेय वाढ मागणी वाढतानाच उत्पादन घटल्याने चहाच्या दरात वाढ झाली आहे. उच्च दर्जाच्या चहाचा दर सध्या ३०० ते ३२५ रुपये किलो, मध्यम स्वरुपाच्या चहाला २२५ ते २५० रुपये तर दक्षिण भारतातील चहाचा दर १३० ते १५० रुपये किलो आहे. कोरोनापूर्वीच्या दराशी तुलना करता त्यामध्ये किलोमागे ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे.
कोरोना काळात आरोग्यदायी पेय म्हणून ग्रीन टीची मागणी अनपेक्षितरित्या वाढली आहे. आमच्याकडे ग्रीन टीच्या मागणीत जवळपास ४०० टक्के वाढ दिसत आहे. देशातही दुपटीपेक्षा अधिक मागणी वाढली आहे.- राजेश शहा, चहा उद्योजक व सदस्य टी बोर्ड ऑफ इंडिया