Join us

LPG Cylinder Price Hike : गॅस सिलिंडरची पुन्हा दरवाढ, सामान्यांना महागाईचा आणखी एक झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 8:39 AM

LPG Cylinder Price Hike : वाढत्या महागाईत कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडचे दर वाढवत ग्राहकांना झटका दिला आहे.

LPG Cylinder Price Hike : महागाईचे चटके सोसत असलेल्या जनतेला इंधन कंपन्यांनी पुन्हा एकदा झटका दिला आहे. गुरुवारी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ३.५० रुपये प्रति सिलिंडर आणि कमर्शिअल सिलिंडरच्या दरात ८ रुपये प्रति सिलिंडरची वाढ करण्यात आली आहे.

एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीनंतर जवळपास सर्वच ठिकाणी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर आता १००० रुपयांच्यावर पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. वाढलेल्या किंमतीनंतर आता दिल्ली घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १००३ रुपये झाली आहे. तर कोलकात्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १०२९ रुपयांवर गेली आहे. तर चेन्नईत एका सिलिंडरसाठी आता १०१८ रुपये द्यावे लागतील.

कमर्शिअल सिलिंडरच्या किंमतीत झालेल्या वाढीनंतर दिल्लीतर एका कमर्शिअल सिलिंडरची किंमत २३५४ रुपये झाली आहे. तर कोलकाता, मुंबई, चेन्नई या ठिकाणी ही किंमत अनुक्रमे २४५४ रुपये, २३०६ रुपये आणि २५०७ रुपये प्रति सिलिंडर इतकी झाली आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी कमर्शिअल एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १० रुपयांची घट झाली होती. तर ८ मे रोजी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. १ मे रोजी एलपीजी गॅसच्या किंमतीत १०२.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. ही दरवाढ १९ किलोंच्या कमर्शिअल सिलिंडरची होती. 

टॅग्स :गॅस सिलेंडरमुंबईदिल्ली