इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरूच आहे. इस्रायल हमासविरोधात मोठी सैनिकी कारवाई करत आहे. गाझा सीमेवर एक लाख सैनिक पाठवण्यात आलेत. इस्रायल हा छोटा देश असला तरी जगभरात त्यांचा दबदबा आहे. आज संपूर्ण जग इस्रायलच्या तंत्रज्ञानाचं कौतुक करतं. इस्रायलचा एकूण जीडीपी ४६.९ लाख कोटी रुपये आहे. जर आपण दरडोई उत्पन्नाबद्दल बोललो तर एक इस्रायली नागरिक दरमहा ४ लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतो. इस्रायलच्या अर्थव्यवस्थेत तीन क्षेत्रांचा सर्वाधिक वाटा आहे.
या सेवांमध्ये सुमारे ७० टक्के सर्व्हिस, सुमारे २.५ टक्के कृषी आणि सुमारे २७ टक्के उद्योगांचा समावेश आहे. इस्रायलचा हिरा उद्योग हा हिरा कापण्याचे आणि पॉलिश करण्याच्या बाबतीतील जगातील प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. एकूण निर्यातीत त्याचा वाटा २३.२ टक्के आहे.
महाराष्ट्रापेक्षाही छोटा देश
इस्रायलची लोकसंख्या सुमारे ९२ लाख आहे. एकूणच महाराष्ट्रापेक्षा इस्रायल लहान आहे. भारत हा इस्रायलचा आशियातील दुसरा आणि जागतिक स्तरावर सातवा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारत आणि इस्रायलमधील व्यापार गेल्या २० वर्षांत ५०.५ पटीने वाढला आहे. इस्रायली ठिबक सिंचन तंत्रज्ञान आणि उत्पादनं आता भारतात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
एप्रिल २०००ते मार्च २०२३ दरम्यान, इस्रायलचा भारतात थेट एफडीआय २८४.९६ मिलियन डॉलर्स होता. इस्रायलनं उच्च तंत्रज्ञान क्षेत्र, कृषी आणि जल क्षेत्रात भारतात ३०० हून अधिक गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये इस्रायलमध्ये भारतीय व्यापारी मालाची निर्यात ७.८९ बिलियन डॉलर्स होती.
अशी होते कमाई
इस्रायल मेटल सायन्स, केमिकल प्रोडक्ट्स, कट हिरे, वित्तीय सेवा, यंत्रसामग्री आणि कम्प्युटर हार्डवेअर निर्यात करतो. यातून देशाला चांगलं उत्पन्न मिळतं. आता इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम इतर देशांवरही होत आहे.