खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : पिझ्झा देताना दिलेल्या कॅरिबॅगचे १४ रुपये ग्राहकाकडून घेतल्याबद्दल डॉमिनोज पिझ्झाला १० लाखांचा दंड चंदीगड राज्य ग्राहक आयोगाने लावला आहे. चंदीगड ग्राहक आयोगाने यापूर्वी अनेक मोठ्या कंपन्यांना दंड लावलेला आहे. यात डॉमिनोजचा दंड सर्वाधिक आहे.
जितेंदर बन्सल यांनी पिझ्झा देताना त्यांच्याकडून कॅरिबॅगचे १३ रुपये ३३ पैसे घेतल्याबद्दल डॉमिनोजविरुद्ध चंदीगड जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवर सुनावणी होऊन ग्राहक मंचाने जुलै २०१९ मध्ये डॉमिनोज पिझ्झाची मालकी असलेल्या ज्युबिलंट फूड वर्क्स लिमिटेड या कंपनीस ५ लाखांचा दंड केला. जिल्हा ग्राहक मंचाच्या या निर्णयास ज्युबिलंट फूड वर्क्सने राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे आव्हान दिले. कॅरिबॅगचे पैसे घेण्यास मनाई करणारा कोणताही कायदा नाही, असे कंपनीचे म्हणणे होते. राज्य ग्राहक आयोगाकडे अपील केल्यानंतरही डॉमिनोजने कॅरिबॅगचे पैसे घेणे सुरूच ठेवले.
नोव्हेंबर २०१९ मध्ये पंकज चंदगोठिया या वकिलाने आणखी एक तक्रार याच कारणासाठी जिल्हा ग्राहक मंच चंदीगडकडे केली. पूर्वीच्या आदेशावर अपील चालू असल्याने दोन्ही तक्रारींवर राज्य ग्राहक आयोगाने सुनावणी घेतली. राज्य ग्राहक आयोगाने वस्तू विक्री कायदा १९३० मधील तरतुदींचा आधार घेत कंपनीचे अपील फेटाळले. या तरतुदीनुसार विक्री केलेल्या मालाची पॅकिंगचा खर्च करण्याची जबाबदारी विक्रेत्याची आहे, असे आयोगाने स्पष्ट केले. आयोगाने दोन्ही ग्राहकांना कॅरिबॅगचे पैसे व प्रत्येकी १५०० रुपये मानसिक त्रासापोटी देण्याचे आदेशही दिले. जिल्हा न्यायालयातील निकालाचा धडा न घेता कॅरिबॅगसाठी वसुली चालूच ठेल्याबद्दल डॉमिनोजला ९ लाख ८० हजार दंड चंदीगड गरीब रुग्ण कल्याण निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले.विक्री कायदा १९३०च्कलम ३६ - वस्तूंच्या वितरणाबाबत नियम/कलम ३६ (५) अन्यथा ठरले नसेल, तर विक्री केलेली वस्तू वितरणयोग्य स्थितीत ठेवणे यासाठी येणारा प्रासंगिक खर्च विक्रेता करील.