तुम्ही 'डोमिनोज' कंपनीचा पिझ्झा ऑर्डर करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड असलेल्या 'डोमिनोज' कंपनीच्या ग्राहकांचा डेटा हॅकर्सनं लीक केला आहे. सुरक्षा तज्ज्ञांच्या माहितीनुसार डार्क वेबवर १८ कोटी ऑर्डर्सचा डेटा हॅकर्सनं प्रसिद्ध केला आहे. यात हॅकर्रनं डोमिनोज कंपनीचा तब्बल १३ टीबीचा डेटा हॅक केला आहे. हॅकर्सकडे आता १८ कोटी ऑडर्सची माहिती असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात ग्राहकांचे फोन नंबर, ईमेल, पत्ता, पेमेंट डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती असल्याचं सांगण्यात येत आहे. (Domino’s India Data Leak Of 18 Cr Orders Resurfaces; Customer Location, Mobile Numbers Exposed)
विशेषत: 'डोमिनोज'कडून सातत्यानं ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांचा यात समावेश आहे. सुरक्षा तज्ज्ञ राजशेखर राजारिया यांनी ट्विटरवर याबाबतचा खुलासा केला आहे. सर्च इंजिनवर १८ कोटी युजर्सचा डेटा उपलब्ध झाला आहे. यात डोमिनोजवरुन नेहमी खरेदी करणाऱ्या युजर्सचा समावेश आहे.
दरम्यान, डोमिनोज इंडियानं मात्र आमच्या युझर्सचा कोणत्याही प्रकारचा डेटा लीक झाला नसल्याचा दावा केला आहे. डोमिनोज ही जगभरातील एक प्रसिद्ध फूड सर्व्हिस कंपनी आहे. जगभरातील २८५ शहरांमध्ये डोमिनोजचे आउटलेट्स आहेत.
डेटा लीक्सची प्रकरणं सातत्यानं समोर येत असून ऑनलाईन ग्राहकांचा डेटा ऑनलाइनच विकला जात असल्याचं सांगितलं जात आहे. ग्राहकांच्या डेटा विक्रीतून हॅकर्स कोट्यवधी रुपयांची कमाई करतात.