Donald Trump : अमेरिकेत नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अनेक राजकीय समिकरणे बदलणार आहेत. आपल्या प्रचाराच्या भाषणांमध्येच ट्रम्प यांनी असे अनेक मुद्दे मांडले होते. आता त्यांच्या ताज्या वक्तव्याने ३ देशांना धक्का बसला आहे. अमेरिकेत येणाऱ्या सर्व चिनी वस्तूंवर अतिरिक्त १०% शुल्क वाढवण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची योजना आहे. चीन व्यतिरिक्त, ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर देखील अतिरिक्त २५ टक्के शुल्कवाढ करणार असल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी गेल्या सोमवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यामुळे भारताचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रादेशिक मुक्त व्यापार करार संपणार?
सीएनबीसीच्या बातमीनुसार, ट्रम्प यांच्या या पोस्टनंतर आणखी एक पोस्ट आली आहे. त्यामध्ये ट्रम्प म्हणाले की, २० जानेवारी रोजी उर्वरित ऑर्डरपैकी पहिला आदेश मेक्सिको आणि कॅनडामधून येणाऱ्या सर्व उत्पादनांवर २५% टॅरिफ लादला जाईल. यामुळे प्रादेशिक मुक्त व्यापार करार संपुष्टात येईल. डोनाल्ड ट्रम्प येत्या २० जानेवारीला अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांनी बेकायदेशीर इमिग्रेशन आणि बेकायदेशीर अंमली पदार्थांचा व्यापार होत असलल्याने हे शुल्क लादणार असल्याचे सांगितले आहे.
ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, विशेषत: फेंटॅनाइल पाठवण्याबाबत मी चीनशी अनेकदा बोललो, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आश्वासन देऊनही बीजिंगने अशा ड्रग्ज दलालांवर कोणतीही कारवाई केली नाही. फेंटॅनाइल एक कृत्रिम ओपिओइड अंमली पदार्थ आहे. ज्यामुळे यूएसमध्ये दरवर्षी हजारो मृत्यू होतात. ट्रम्प म्हणाले की आपल्या देशात ड्रग्ज मुख्यतः मेक्सिकोमार्गे येत आहेत, जे इतक्या प्रमाणात यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते. जोपर्यंत या गोष्टी थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही चिनी वस्तूंवर १० टक्के अतिरिक्त शुल्क लागू करू.
चिनी वस्तूंवर ६० टक्के शुल्क लावण्याची धमकी
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचार करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर ६० टक्के शुल्क लागू करण्याची धमकी दिली होती. सप्टेंबरपर्यंतच्या यूएस डेटानुसार, मेक्सिको हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, त्यानंतर कॅनडा आणि चीन आहेत. दरम्यान, भारतावर अद्याप कुठलेही शुल्क लादण्याचा विचार अमेरिकेचा नसल्याचं समोर आलं आहे.