donald trump reciprocal tariff : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आल्यापासून मनमानी कारभार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आधी सरकारी कर्मचारी कपात आणि आता ५० हून अधिक देशांवर टॅरिफ लादला आहे. ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकन लोक रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, ट्रम्प यांचा टॅरिफ लादण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या प्रत्युत्तर शुल्कामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल आणि त्यामुळे जागतिक मंदीही येऊ शकते, असं अर्थतज्ज्ञ आकाश जिंदाल यांनी म्हटलं आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना जिंदाल म्हणाले की, माझ्या मते हा एक वाईट निर्णय आहे, ज्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावेल आणि तिथल्या ग्राहकांचे अधिक नुकसान होईल.
टॅरिफमुळे भारताला दीर्घकाळात नुकसान नाही : अर्थतज्ज्ञ ते पुढे म्हणाले की, आपलं सरकार समाधानाभिमुख असून परिस्थिती पाहून निर्णय घेते. केंद्र सरकारने अमेरिकेशी टॅरिफची वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. पण, अमेरिकेने प्रतिउत्तर शुल्क लादले. या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे अल्पावधीसाठी नुकसान होईल. मात्र, त्यामुळे दीर्घकाळात कोणतीही हानी होणार नसल्याचेही जिंदाल यांनी स्पष्ट केलं.
अमेरिकेत इतिहासाच पुनरावृत्ती होईल?परदेशी वस्तूंवर उच्च आयात शुल्क लादून स्वदेशीला चालना मिळेल अशी ट्रम्प यांची धारणा आहे. पण, १९३० साली अमेरिकन काँग्रेसनेही अशीच चूक केली होती. त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण जगात प्रचंड मंदी आली. याचा सर्वाधिक फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बसला होता. ९५ वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांनी परदेशी वस्तूंवर उच्च शुल्क लादले होते. यासाठी त्यांनी हॉले-स्मूट टॅरिफ कायदा १९३० पास केला. या कायद्याचा उद्देश परदेशी वस्तूंवर शुल्क वाढवून अमेरिकन उद्योगांना आणि शेतकऱ्यांना संरक्षण देणे हा होता. या कायद्यानुसार, त्यावेळी २०,००० हून अधिक आयात केलेल्या वस्तूंवर शुल्क लादण्यात आले होते. मात्र, या कायद्याचा विपरीत परिणाम झाला. वाढलेल्या टॅरिफमुळे, इतर देशांनी देखील अमेरिकन निर्यातीवर शुल्क लादले. विशेषत: युरोप आणि इतर प्रदेशातील देशांनी अमेरिकन उत्पादनांवर उच्च शुल्क लादले. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठी घट झाली. त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला.
ट्रम्प यांच्या निर्णयाला अर्थतज्ज्ञांचाही विरोधडोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा अर्थतज्ज्ञांनीही विरोध केला आहे. काही अर्थतज्ञांच्या मते हा निर्णय म्हणजे पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारतावरही परिणाम झाला आहे.
वाचा - अमेरिकेच्या मनमानीविरोधात भारत-चीन एकत्र? डोनाल्ड ट्रम्प यांना देणार प्रत्त्युत्तर
भारतावर २६ टक्के टॅरिफ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर लादलेल्या प्रत्युत्तर शुल्कामुळे जागतिक बाजारपेठेत अल्पकालीन अशांतता निर्माण होऊ शकते. या दराचा सर्वाधिक फटका वाहन, स्टील आणि कृषी क्षेत्राला बसणार आहे. मात्र, फार्मावर कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २६ टक्के, चीनवर ३४ टक्के, व्हिएतनामवर ४६ टक्के आणि युरोपियन युनियनवर २० टक्के असे अनेक देशांवर शुल्क लादण्याची घोषणा केली.