मुंबई - भारतील नामवंत आणि प्रसिद्ध उद्योजक असलेल्या रतन टाटा यांची दर्यादिली आणि दानत जगाला माहिती आहे. त्यामुळेच, रतन टाटा यांच्यावर कोट्यवधी भारतीय प्रेम करतात. त्याचप्रमाणे, टाटा हेही भारतावर आणि भारतीय नागरिकांवर प्रेम करतात. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची अगदी कुटुंबाप्रमाणे काळजी करतात. कोरोना कालावधीतही टाटा यांच्या या दानशूर स्वभावाचा देशावासीयांनी अनुभव घेतला आहे. कोरोना काळात टाटा कंपनीने लॉकडाऊनमध्येही कर्मचाऱ्यांना पगार तर दिला. आता, कंपनीतील कर्मचाऱ्यांनासाठी दिवाळी बोनसही जाहीर केला आहे.
देश का नमक टाटा नमक म्हणत रतन टाटा यांच्या दानशूरपणाचे नेटीझन्सने कौतुक केले होते. रतन टाटा यांनी लॉकडाऊन काळात पंतप्रधान सहायता निधीसाठी तब्बल 1500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. विशेष म्हणजे कोविड योद्धा बनून रुग्णलयात काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी आपलं ताज हॉटेलही खुलं केलं होतं. रुग्णलयात याच हॉटेलमधून दररोज जेवणाचे डबेही पुरविण्यात आले. देशावरील प्रत्येक संकट हे आपली जबाबदारी बनून काम करणाऱ्या रतन टाटा यांच्यावर तरुणाई अत्यंत प्रेम करत असून नितांत आदरही करते. त्यांच्या कामातून टाटांबद्दलचा हा आदर नेहमीच वाढताना दिसतो. कोरोना लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांना पगार दिल्यानंतर आता बोनसही टाटा कंपनीकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे, कोरोनाच्या सावटातही कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी होईल.
टाटा स्टीलने सोमवारी २३५.५४ कोटी रुपये बोनस म्हणून वाटले जाणार असल्याचे जाहीर केले. ही रक्कम २४ हजार ७४ कर्मचाऱ्यांमध्ये वाटली जाणार आहे. जमशेदपूर युनिटमधील ट्यूब डिव्हिजनच्या १२ हजार ८०७ कर्मचाऱ्यांना १४२.०५ कोटी रुपये मिळतील. तर बाकीचे ९३.४९ कोटी रुपये कलिंगानगर युनिट, मार्केटिंग आणि विक्री, नोवामुंडी, जामाडोबा, झरिया आणि बोकारो मायनसच्या ११ हजार २६७ कर्मचाऱ्यांमध्ये वाटले जातील.
ग्रेट रिव्हिजननुसार वाढलेला बेसिक, डीए आणि १८ महिन्यातील अनुशेष यामुळे या वर्षी बोनसची रक्कम अधिक असेल. गेल्या वर्षी १५.६ टक्के बोनस मिळाला होता. तर या वर्षी तो १२.९ टक्के म्हणजे २.७ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षी बोनसची अधिक रक्कम २.३६ लाख इतकी होती तर या वर्षी ती ३.०१ लाख इतकी आहे.
कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांबद्दल नाराजी
कोरोना काळामध्ये लॉकडाऊन झाल्याने अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरु केली आहे. छोट्या मोठ्या खासगीच नाही तर एअर इंडियानेही पाच वर्षे कर्मचाऱ्यांना बिनपगारी घरी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या साऱ्या कर्मचारी कपातीवर टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा चांगलेच भडकले आहेत. त्यांनी या कंपन्यांना चांगलेच सुनावले आहे. टाटा यांनी न्य़ूज वेबसाईट YourStory ला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना काळात कंपन्यांमधून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे. यावरून असे वाटत आहे की, कंपन्यांच्या मुख्य नेतृत्वाकडे सहानुभूतीची कमतरता झाली आहे. ज्या लोकांनी त्यांचे पूर्ण करिअर कंपनीसाठी खर्ची घातले त्या लोकांना पाठिंबा देण्याऐवजी बेरोजगार केले जात आहे, असा आरोप टाटा यांनी केला आहे.